सिंदखेडराजा | समाधान सरकटे
सिंदखेडराजा ते मेहकर मार्गावर पळसखेड चक्का परिसरात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकल पुलावरून खाली कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणावर जालन्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना मुंबई-नागपूर महामार्गावर किनगाव राजाकडून सिंदखेडराजाकडे येत असताना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश साळवे आणि दीपक उत्तम पिंपळे हे दोघे एम.एच. २८ एल ५०३९ क्रमांकाच्या मोटरसायकलने सिंदखेडराजाच्या दिशेने येत होते.
पळसखेड चक्का येथील तीव्र वळणावर मोटरसायकल पुलाजवळून खाली खोल खड्यात कोसळली. या अपघातात गणेश साळवे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दीपक उत्तम पिंपळे हे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर जखमी दीपक पिंपळे यांना तातडीने उपचारासाठी जालन्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गणेश साळवे आणि दीपक पिंपळे हे दोघेही चिंचोली जहागीर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
या अपघातानंतर पळसखेड चक्का येथील पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या पुलावर सुरक्षेसाठी आवश्यक कठडे नसल्याने तीव्र वळणावर वाहनचालकांसाठी धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी यापूर्वीही लहान-मोठे अपघात झाले आहेत. पुलाला सुरक्षा कठडे उभारण्याची मागणी संबंधित विभागाकडे यापूर्वी करण्यात आल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, अद्याप आवश्यक सुरक्षा उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर पळसखेड चक्का येथील पुलाची तातडीने पाहणी करून आवश्यक सुरक्षा कठडे, दिशादर्शक फलक आणि इतर सुरक्षाव्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या अपघातामुळे चिंचोली जहागीरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. वृत्त लिहीपर्यंत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती मिळाली.
अपघात, रस्त्यांची समस्या, नागरिकांच्या अडचणी किंवा स्थानिक घडामोडींची माहिती असल्यास Katta News शी संपर्क साधा.










