समृद्धी महामार्गावरील सोन्याची लूट प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. साडेचार कोटी रुपयांच्या सोन्याच्या लुटीतील सहा आरोपींना पोलिसांनी पुन्हा मेहकर न्यायालयात हजर केलं असून, मेहकर पोलिसांनी आरोपींची अतिरिक्त कोठडीची मागणी केली आहे.
पोलिसांचा दावा आहे की अजूनही अडीच कोटी रुपयांचे सोने सापडलेले नाही आणि मुख्य सूत्रधार फरार आहे.
२२ ऑगस्टच्या सायंकाळी फर्दापूर टोल नाक्याजवळ मुंबईतील एका सोनेव्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून साडेचार कोटी रुपयांचे सोने लुटण्यात आले होते. या समृद्धी महामार्गावरील सोन्याच्या लुटीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.
या प्रकरणाचा तपास मेहकर पोलिस आणि बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केला. राजस्थानमधील सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सुमारे अडीच किलो सोने जप्त करण्यात आलं आहे; मात्र उर्वरित सोने आणि गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधार यांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही.
अटक आरोपींमध्ये विजयसिंग रामसिंग साखला, शिवसिंग लालसिंग, शैतानसिंग भैरवसिंग कितावत, रतनसिंग अमरसिंग सारंगदेव, शंकरसिंग जोधसिंग डुलावत आणि गमेरसिंग शंभूसिंग राठोड (सर्व राजस्थान) यांचा समावेश आहे.
प्रारंभी मेहकर न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. ती मुदत संपल्यानंतर त्यांना बुलढाणा जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
हे पण वाचा.
त्यानंतर, ३१ ऑक्टोबर रोजी मेहकर पोलिसांनी आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करून अधिक चौकशीसाठी अतिरिक्त कोठडीची मागणी केली.
दरम्यान, आरोपींची वैद्यकीय तपासणी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. या प्रकरणात अजून काही आरोपी फरार असून, उर्वरित अडीच कोटी रुपयांचे सोने हस्तगत करण्यासाठी मेहकर पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी साठी आजचा आपल्या kattanews.in या न्युज पोर्टलला अवश्य भेट द्या.










