चिखली |विशाल गवई
पेट्रोल-डिझेल दरवाढ, वाढती महागाई, गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती आणि शेतकऱ्यांच्या डिझेल समस्येमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल-डिझेलसाठी नागरिकांना रात्रभर रांगा लावाव्या लागत असून २४-२४ तास प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. महागाईमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले असून मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केला.
सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा चिखली तालुका काँग्रेसच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामभाऊ जाधव, माजी सभापती विष्णु पाटील कुळसुंदर, समाधान सुपेकर, प्रदीप आंभोरे, नंदुभाऊ शिंदे, श्याम पठाडे, डॉ. माहेमंद इसरार, सचिन बोंद्रे, अंबादास वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुका काँग्रेसच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
- पेट्रोल व डिझेलवरील केंद्र आणि राज्य शासनाचे कर तात्काळ कमी करावेत.
- वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात.
- जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती कमी करण्यात याव्यात.
- शेतकऱ्यांना शेती उपयोगासाठी कॅनमध्ये डिझेल देण्याबाबत स्पष्ट नियम लागू करावेत.
- ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना कोणतीही अडचण न आणता डिझेल उपलब्ध करून द्यावे.
- गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा.
- वाढत्या इंधन दरामुळे वाढलेल्या वाहतूक खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत.
दरम्यान, चिखली मतदारसंघाच्या आमदारांनी तहसील कार्यालयातील बैठकीत पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही पेट्रोल-डिझेल महाग झाल्याचे विधान केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. भारताची तुलना पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत करणे म्हणजे देशाचा अपमान असल्याची टीका राहुलभाऊ बोंद्रे यांनी केली. संबंधित आमदारांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
हे पण वाचा..
- साखरखेर्ड्यात पोलवर वीज दुरुस्ती करताना कंत्राटी कामगाराचा मृत्यू; २५ वर्षांत पाचवी दुर्घटना
- घरासमोर लिंबू टाकून जादूटोणा? CCTV मुळे उघड झाला धक्कादायक प्रकार; चिखलीत आरोपीवर गुन्हा
- गॅस सिलेंडर दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
हे आवश्यक करा
ताज्या ब्रेकिंग न्यूज, राजकीय घडामोडी, शेती, गुन्हे आणि स्थानिक अपडेट्ससाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.










