मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळात तब्बल १७,७४२ चालक आणि वाहक पदांची मेगाभरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे एसटी सेवेत मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विधान परिषदेत आमदार श्रीकांत भारतीय यांनी कंत्राटी भरती व कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, २०२२ मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून तातडीचा उपाय म्हणून कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची भरती करून एसटीची स्वतःची यंत्रणा अधिक मजबूत करण्यात येणार आहे.
महामंडळाने राज्य सरकारच्या वित्त विभागाकडे भरतीचा सविस्तर प्रस्ताव पाठवला असून त्यामध्ये १२,३८१ नवीन चालक आणि वाहक पदे तसेच पुढील चार वर्षांत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागी ५,३६१ पदे भरण्याचा प्रस्ताव आहे. अशा प्रकारे एकूण १७,७४२ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने एसटीच्या ताफ्यात वाढ करण्यासाठी दरवर्षी ५,००० नवीन बसेस खरेदी करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापैकी ८,००० बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ३,००० बसेस प्रत्यक्ष रस्त्यावर धावू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
महिलांसाठी ५० टक्के प्रवास सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास अशा योजनांमुळे एसटी महामंडळावर आर्थिक भार येत असला तरी सर्वसामान्यांना स्वस्त व सुरक्षित प्रवास देण्याच्या उद्देशाने सरकार कटिबद्ध असल्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.
या मेगाभरतीमुळे एसटीचा दर्जा अधिक सुधारेल आणि कंत्राटी पद्धतीवरील अवलंबित्व कमी होईल, असा विश्वासही सरकारने व्यक्त केला आहे. तसेच या विषयावर अधिक सखोल चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठक घेण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे.
Related News
- एसटी प्रवाशांसाठी नवीन नियम लागू; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सरकारी भरतीची तयारी
- मोठी अपडेट! सरकारी नोकरभरती परीक्षांचे शुल्क 50% करण्याची मागणी; लाखो विद्यार्थ्यांना मिळू शकतो दिलासा
अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.










