मुंबई/प्रतिनिधी
बरेच दिवसापासून प्रतीक्षा असलेला महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल काल वाजला आहे.अखेर महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. प्रचाराचे फटाके दिवाळीच्या आधी सुरू होतील आणि दिवाळी संपल्यानंतर अधिक जोमाने वाजतील. दोन टप्प्यांत निवडणुका होतील, असे धुरंधर अंदाज व्यक्त होत होते. मात्र, राज्यात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. वेगवेगळ्या कारणांमुळे महाराष्ट्रातील निवडणुकीकडे अख्ख्या देशाचे लक्ष लागले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी मंगळवारी झारखंड विधानसभा निवडणुकांचीही घोषणा केली. १३ नोव्हेंबर व २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत झारखंडमध्ये निवडणुका पार पडतील व मतमोजणी २३ नोव्हेंबरलाच होईल. या घोषणेसोबतच दोन्ही राज्यांत निवडणूक आचारसंहिता लागु झाली आहे.
राज्यात एकूण ९.६३ कोटी मतदार
निवडणुकीसाठी राज्यात एकूण १ लाख १८६ मतदान केंद्र उभारली जातील. राज्यात एकूण ९.६३ कोटी मतदार आहेत. यात ४.९७ कोटी पुरुष आणि ४.६६ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तृतीयपंथीय मतदारांची संख्या ६,०३१ आहे. राज्यात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या २०.९३ लाख आहे. १.८५ कोटी युवा मतदार हे २० ते २९ वयोगटातील आहेत. तर १२.४३ लाख मतदारांचे वय ८५ हून अधिक असून त्यांना घरातून मतदानाचा हक्क बजावता येईल, अशी माहिती कुमार यांनी दिली. विद्यमान राज्य विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे.