मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या शासकीय वसतिगृहातील ५वीतील विद्यार्थ्याचा खडकपूर्णा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, कलोरा येथील स्वराज गणेश खरात हा विद्यार्थी अंचरवाडी येथील शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होता. आई-वडिलांचे छत्र हरविल्यानंतर त्याचा सांभाळ आजी करत होती. स्वराज अंचरवाडी येथील शासकीय वसतिगृहात राहत होता, जिथे सुमारे ४५ विद्यार्थी राहतात.
१५ फेब्रुवारी रोजी सुट्टी असल्यामुळे स्वराज दुपारी सुमारे १२ वाजता मित्रांसोबत खडकपूर्णा कालव्यात पोहण्यासाठी गेला. तिघांनी कालव्यात उड्या घेतल्या; त्यापैकी दोघांना पोहता येत असल्याने ते सुरक्षित वर आले. मात्र स्वराजला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.
घटनेनंतर उपस्थित महिलांनी आरडाओरड केल्यावर स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले. पोहणाऱ्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो आढळला नाही. माहिती मिळताच अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे घटनास्थळी दाखल झाले. चिखली तहसील प्रशासन व आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. शोधमोहीमेदरम्यान काही अंतरावर स्वराजचा मृतदेह आढळून आला.
घटनास्थळी नातेवाईक व ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली. शाळा व वसतिगृह कर्मचारी येईपर्यंत मृतदेह उचलू नये, अशी नातेवाईकांनी भूमिका घेतली. सरपंच समाधान परिहार, सुनील परिहार, जमादार सिद्धार्थ सोनकांबळे, तहसील कर्मचारी व कालव्याचे उपअभियंता घुले उपस्थित होते.
पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथे पाठविण्यात आला. स्वराजच्या पश्चात एक भाऊ असून तो आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. स्वराजची काळजी घेणाऱ्या आजीचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
दरम्यान, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या हालचालींवर योग्य देखरेख नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
👉 संबंधित बातम्या
- पांग्रीकाटे येथे शेतात अफू शेतीचा भांडाफोड! दीड कोटींचा माल जप्त; दोन आरोपी अटकेत
- सायबर पोलिसांची मोठी कारवाई! लोणार तालुक्यातील तरुणावर NCCRP तक्रार; सोशल मीडियावरील पोस्टमुळे खळबळ
- मोजणी काम ठप्प! भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन; २ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा
👉 आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या
स्थानिक बातम्यांचे तत्काळ अपडेट मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.











