देऊळगाव राजा प्रतिनिधी/
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गांजा व इतर अंमली पदार्थांची लागवड, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा अंतर्गत विशेष पथक कार्यरत आहे.
मेहुना राजा शिवारात गांजाची अवैध लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महसूल विभागाचे अधिकारी, पंच, फोटोग्राफर व वजनकाटाधारकांच्या उपस्थितीत छापा टाकला.
फॉरेन्सिक पथकाच्या बॅटरीच्या प्रकाशात पाहणी केली असता, तुरीच्या शेतात ठिकठिकाणी चार ते पाच फूट उंचीची पूर्ण वाढ झालेली हिरव्या रंगाची गांजाची झाडे तसेच सुकलेली गांजाची झाडे आढळून आली. ही गांजाची अवैध शेती संगोपन करून वाढवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
या कारवाईत ओली गांजाची झाडे वजन २८ किलो ५१ ग्रॅम (किंमत ₹२,८५,१००) आणि सुकलेली गांजाची झाडे वजन ४ किलो ७०० ग्रॅम (किंमत ₹९४,०००) असा एकूण ₹३,७९,१०० किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
या प्रकरणी विष्णु सुखदेव बोरुडे (वय ३९, रा. मेहुना, ता. देऊळगाव राजा) यास १६ डिसेंबर रोजी पहाटे ३.१४ वाजता अटक करण्यात आली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
📌 हे पण वाचा…
- इंस्टाग्रामवर प्रेमाचा एक इमोजी पाठवला अन् तरुणाच्या आयुष्याला बेडी; थेट कारागृहात.
- दरोडा नव्हे तर नवरी पलायनाचा थरार! रिसोड–मोप रस्त्यावर अपहरणाचा मोठा कट उघड.
- लोणार सरोवरात नेमकं काय घडतंय? पाण्याची रहस्यमय वाढ, उत्तर अजूनही शून्य.
📲 अधिक ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in वाचत रहा.











