बुलढाणा | प्रतिनिधी |भागवत गायकवाड
विद्यार्थ्यांना शांत, अभ्यासपूर्ण आणि सुसज्ज वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चौथा ग्रामपंचायतीने विद्यार्थीहिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृह स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, चौथा यांना अभ्यासिकेसाठी सुपूर्द केले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना नियमित अभ्यासासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध झाली असून ग्रामस्थांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन म. पू. मा. शाळेचे मुख्याध्यापक आर. पी. जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. शिक्षणाला चालना देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी तसेच स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी शांत वातावरणात अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी श्री. वाय. मुळे, ग्रामपंचायत सचिव संतोष कुल्हाळे, रघुनाथ नप्ते, विनोद धंदर यांच्यासह परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शिक्षणात यश संपादन करावे, असे आवाहन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची योग्य सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने चौथा ग्रामपंचायतीने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
📲 आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा!
बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधीच्या बातम्या मिळवण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.










