बुलढाणा |मनोहर खंदारे
बुलढाणा जिल्हा रुग्णालयातील कथित खरेदी गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. जिल्हा रुग्णालयातील खरेदी प्रक्रियेत आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
खरात यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील चौकशी आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. संबंधित प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा त्यांचा दावा आहे.
यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणातील संबंधित कागदपत्रांची तपासणी करून चौकशी पूर्ण करावी आणि त्यातून काही अनियमितता किंवा नियमभंग आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच शासन स्तरावर आवश्यक मंजुरी देऊन या प्रकरणावर योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणीही खरात यांनी केली आहे. चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचा दावा करण्यात येत असताना प्रत्यक्ष कार्यवाहीला विलंब का होत आहे, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा या प्रकरणाची दखल घेऊन वस्तुनिष्ठ चौकशी करतील का, याकडे आता लक्ष लागले आहे. शासनाकडून या प्रकरणी पुढील निर्णय काय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
👉 WhatsApp Group Join करा










