जिल्हा प्रतिनिधी – नारायणराव आरू पाटील, रिसोड
रिसोड तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक ३ नोव्हेंबर रोजी मालेगाव नाक्याजवळील विश्वा लॉन येथे आयोजित करण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ही आढावा बैठक वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, संपर्कप्रमुख सुधीर कव्हर, जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, रिसोड विधानसभेचे सहसंपर्कप्रमुख विश्वनाथ सानप आणि उपजिल्हाप्रमुख डॉ. चंद्रशेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडणार आहे.
बैठकीत प्रत्येक जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण तसेच नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.
हे पण वाचा.
रिसोड तालुक्यात बूथ वाढ! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत १६ नवीन मतदान केंद्रांची निर्मिती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी, तसेच आजी-माजी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.
तालुक्यातील सर्व शाखाप्रमुख, तालुका संघटक, उपतालुकाप्रमुख, सर्कल प्रमुख, इच्छुक उमेदवार आणि त्यांना सहकार्य करणारे शिवसैनिक यांनी सकाळी १०.३० वाजता वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन रिसोड शिवसेना तालुकाप्रमुख नारायण आरू यांनी केले आहे.
या बैठकीत पक्षाची संघटनात्मक तयारी, प्रचार आराखडा, आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये पक्ष अधिक बळकट करण्याचे धोरण यावर चर्चा होईल. कार्यकर्त्यांमध्ये या बैठकीबद्दल उत्सुकता असून, संपूर्ण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची चळवळ पुन्हा जोमात येण्याची शक्यता आहे.










