Shegaon : दिवाळीचा उत्सव साजरा करण्यासाठी अनेक नागरिक बाहेरगावी गेले असताना शेगाव शहरात चोरट्यांनी हजेरी लावली. एका रात्रीत चार घरफोड्यांची मालिका घडून आली असून लाखोंचा सोनं-चांदीचा ऐवज लंपास झाला आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
shegaon शहरातील राज राजेश्वर कॉलनी व श्रीराम नगर परिसरात २५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ही घटना घडली.दिवाळी साजरी करण्यासाठी घर बंद करून गेलेल्या नागरिकांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी चार वेगवेगळ्या घरात हात साफ केला.
पहिली तक्रार सौ. सोनाली रघुनाथ ढगे (डांगरे), वय ३५, रा. राज राजेश्वर कॉलनी यांनी दिली. त्या दिवाळी सण साजरा करण्यासाठी अकोला येथे सासरी गेल्या होत्या. २६ ऑक्टोबर रोजी परतल्यावर दरवाज्याची कडी बाहेरून लावलेली आणि कुलूप तोडलेले आढळले. घराची पाहणी केली असता सामान अस्ताव्यस्त व अलमारी उघडी दिसली. त्यातील सोनं-चांदीचा सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.
हेही वाचा .
Shegaon Crime News: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार – दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
दुसऱ्या घटनेत शेजारील सौ. मनिषा अमितकुमार चंदणगोळे यांच्या घरातून सोन्याचे मंगळसूत्र, चैन, अंगठ्या व चांदीचे दागिने असा सुमारे २५ हजार रुपयांचा माल चोरीस गेला.तिसऱ्या घटनेत आशिष मनोहर जुमडे यांच्या घरातील सोन्याचे कानातले गायब झाले, तरचौथ्या घरफोडीत ग. भा. ज्योती सुरेश सरोदे, श्रीराम नगर यांच्या घरातून चांदीच्या मूर्ती, पादुका, तोरड्या असा एकूण ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.
या चारही घटनांनंतर शेगावात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.शेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(ए), ३३१(३), ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव करीत आहेत.
राज राजेश्वर कॉलनी व श्रीराम नगर परिसरातील रहिवाशांमध्ये चोरट्यांच्या या कारवायांमुळे प्रचंड नाराजी असून, नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. दिवाळीसारख्या सणात शहरात अशी घटना घडल्याने लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे.
शेगाव शहरात झालेल्या या चार घरफोड्यांच्या घटना पोलिस प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहेत. सणासुदीच्या काळात नागरिकांनी घर बंद करताना सुरक्षा यंत्रणा मजबूत ठेवणे आणि सीसीटीव्ही प्रणाली कार्यरत ठेवणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.










