विजय जुंजारे/प्रतिनिधी
रिसोड शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील रॅम्प वॉक गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ शोभेची वस्तू बनला आहे. अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेला हा रॅम्प आज वापरात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रिसोड तालुक्याला जोडलेली सुमारे 70 ते 80 खेडी या शाखेशी संबंधित असून, जवळपास 70 हजार ग्राहक या बँकेचे आहेत. त्यामध्ये अपंग, निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र, इतक्या मोठ्या ग्राहकसंख्येनंतरही बँकेकडून व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
रॅम्प आहे, पण व्हीलचेअर नाही!
भारतीय स्टेट बँकेने काही महिन्यांपूर्वी अपंग आणि वृद्ध नागरिकांच्या सोयीसाठी रॅम्प वॉक तयार केला होता. मात्र, त्या रॅम्पचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी आवश्यक असलेली व्हीलचेअर सुविधा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे अपंग ग्राहकांना बँकेत प्रवेश करणे अत्यंत अवघड झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “रॅम्प बांधला पण त्याचा वापर कुठे? हे फक्त शोभेचे साधन ठरले आहे,” असे नागरिक सांगतात. काही ज्येष्ठ नागरिकांनी तर बँकेत प्रवेश करताना येणाऱ्या त्रासामुळे रांगेत उभे राहणेच टाळले असल्याचे सांगितले.
हेही वाचा ..
हवामान विभागाचा इशारा! पुढील 24 तास घराबाहेर पडू नका – 55 किमी वेगाने वारे व मुसळधार पाऊस.
बँक प्रशासनाचे दुर्लक्ष
या समस्येला जवळपास सहा महिने उलटून गेले असले तरी बँक प्रशासनाने अजून कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे अपंग आणि वृद्ध ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. दररोज बँकेत येणाऱ्या अनेक ग्राहकांना या सुविधेअभावी त्रास सहन करावा लागत आहे.
















