Washim : तांत्रिक कामगारांच्या प्रश्नाबाबत वीज तांत्रिक कामगार मित्र संघ आक्रमक, दीर्घ आंदोलन करणार.

 

 

नारायणराव आरु पाटील, वाशीम /जिल्हा प्रतिनिधी 

 

Washim : वीज तांत्रिक कामगारांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत सातत्याने होत असलेली दिरंगाई, ही कामगारांमध्ये असंतोष निर्माण होण्याचे मुख्य कारण असून, तांत्रिक कामगारांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी ‘वीज तांत्रिक कामगार मित्र संघाने’ केली असल्याची माहिती प्रसिद्ध पत्रकात दिली आहे.

 

 

 

सरकारी मालकीच्या महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपन्यातील तांत्रिक कामगारांचे महत्त्वाचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी कामगार संघटनांनी लाईन स्टाफ बचाव कृती समिती व महावितरण ऑपरेटर्स बचाव कृती समितीच्या माध्यमातून दीर्घ कालावधीची आंदोलने केली होती. त्या आंदोलनादरम्यान प्रशासन सकारात्मक होते. वेतन वाढ करार २०२३-२८ प्रक्रिये दरम्यान प्रलंबित प्रश्न निकाली काढू. असे वीज प्रशासनाने तेव्हा सांगितले होते.

 

 

 

दरम्यान, दिनांक ७ जुलै २०२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पातळीवर वेतन करार २०२३-२८ पूर्ण झाला. त्यात मूळ वेतन व भत्त्यांच्या वाढीचा निर्णय झाला, परंतु तथापि, तांत्रिक कर्मचाऱ्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न / ॲनामलीवर काहीही निर्णय झाला नाही. त्यावरही तात्काळ निर्णय घेण्याची संघटनांची मागणी होती. तेव्हा, ऊर्जामंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यावर वीज प्रशासनाच्या वतीने अप्पर ऊर्जा सचिवांनी ‘पुढील दोन महिन्यात निर्णय घेऊ’ असे तोंडी आश्वासन दिले होते.

 

 

 

परंतु, दोन महिन्यांनंतरही प्रलंबित प्रश्नांबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तांत्रिक कामगारांचे प्रश्न प्रलंबितच असल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. या बाबत त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. वीज प्रशासन प्रत्येक वेळी वेळ काढूपणा करीत असल्याने संघटनांना आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नसल्याने वीज तांत्रिक कामगार मित्र संघ कृती समितीने दिनांक २३ सप्टेंबर २०२४ पासून दीर्घ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

सोमवार दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन, गुरुवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सर्व मंडळ कार्यालयासमोर भव्यद्वार सभा, मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्व परिमंडळ कार्यालयासमोर प्रचंड द्वार सभा. मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत प्रचंड जन आंदोलन (कार्यालयीन वेळेत) करण्यात येणार आहे. हे आंदोलन प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे करावे लागत असल्याने यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही संघटनांनी कळवले आहे.

 

 

आंदोलनात तांत्रिक कामगार युनियन ५०५९. स्वाभिमानी वि. वर्कर्स युनियन ,क्रांतिकारी लाईन स्टाफ सेना, म. रा. विद्युत ऑपरेटर्स संघटना, स्वतंत्र ब. विद्युत कर्मचारी संघटना, म. रा. वी. कामगार फेडरेशन, बहूजन वि. क. अ. अभियंता फोरम, राष्ट्रीय ड्रायव्हर्स क्लिनर्स असोसिएशन, राष्ट्रीय मुलनिवासी वीज कर्मचारी संघटना, राष्ट्रवादी वीज कामगार काॅंग्रेस या संघटना सहभागी होणार असून, या आंदोलनामध्ये राज्यातील तमाम वीज कामगारांनी सहभागी होण्याचे आवाहन ‘वीज तांत्रिक कामगार मित्र संघाने’ केले आहे.

 

 

या प्रश्नांसाठी होणार आंदोलन…

 

⚫ वर्ग ३/४ लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना वर्ग चार मधून वर्ग ३ मध्ये समावेशन करण्यात यावे.

 

⚫ लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना दहा वर्षात सेवेनंतर यंत्रचालक पदावर जाण्याचा पर्याय खुला करण्यात यावा.(विद्युत सहाय्यक पदावरील कालावधीसह),

 

⚫ महावितरण यंत्रचालक, तिन्ही कंपन्यांतील प्रधान तंत्रज्ञ, मुख्य तंत्रज्ञ या तांत्रिक तसेच ड्रायव्हर्स क्लिनर्स कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतन ॲनामली तात्काळ सोडवाव्यात.

 

⚫ लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या चर्चेत ठरल्याप्रमाणे २० लिटर इंधन भत्ता फरकासह लागु करण्यात यावा,

 

⚫ महावितरण यंत्रचालकांसाठी महापारेषण मधील सन २०१७ पुर्वीच्या वरिष्ठ यंत्रचालक पदाच्या समतुल्य वेतनाचे पद, लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना वीज मंडळ असताना अस्तित्वात होती, ती उच्च वेतनाची पदे पुन्हा खुली करण्यात यावी.

 

⚫ १ एप्रिल २०१९ नंतरची उपकेंद्रे कायम यंत्रचालकांसाठी खुली करण्यात यावी.

 

⚫ तिन्ही कंपन्यातील कामगारांचा वार्षिक इन्क्रिमेंट रेशियो सारख्या टक्केवारीत करण्यात यावा.

 

⚫ सर्व सहाय्यकांचा कंत्राटी कालावधी जि. ओ. लाभ व उपदानासाठी ग्राह्य धरण्यात यावा.

 

⚫ सर्व शाखा कार्यालये, उपकेंद्रांना योग्य क्षमतेचे टूल्स उपलब्ध करून देण्यात यावे.

 

⚫ अपघात विमा मर्यादा रुपये ५० लाख करण्यात यावी.

 

⚫ तिन्ही कंपन्यांच्या वीज कामगारांना सेवेच्या २८ वर्षानंतरचा जि. ओ. सेवेच्या २५ व्या वर्षी, व विना अट लागू करण्यात यावा.

 

⚫ पगारवाढ विलंबाने झाल्याने त्याला विलंब काळातील वाढीव घरभाडे भत्ता अदा करण्यात यावा.

 

⚫ एम एम बी ची कपात करण्याच्या रकमेत वाढ करून मयत कामगारांच्या वारसांना वाढीव निर्वाह भत्ता देण्यात यावा.