देऊळगाव राजा | मनोहर खंदारे
सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असून, आता थेट दहशतवादी प्रकरणाचा संदर्भ देत अटकेची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. पुलवामा दहशतवादी प्रकरणातील आर्थिक व्यवहारांशी संबंध असल्याचा बनाव करून देऊळगाव राजा येथील एका निवृत्त बँक व्यवस्थापकाची तब्बल १४ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. चार दिवस व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात ठेवून मानसिक दबाव निर्माण करण्यात आला आणि अखेर आरटीजीएसच्या माध्यमातून रक्कम हस्तांतरित करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
श्रीकिशन गिरधारीलाल अग्रवाल (वय ५९, रा. बँक नगर, देऊळगाव राजा) असे फसवणूक झालेल्या निवृत्त बँक व्यवस्थापकाचे नाव आहे. ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या देऊळगाव राजा शाखेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. निवृत्तीनंतरही सायबर भामट्यांनी त्यांना लक्ष्य करत मोठी आर्थिक फसवणूक केली.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, १० ऑक्टोबर रोजी अग्रवाल यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने आपण कुलाबा पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. पुलवामा दहशतवादी प्रकरणाशी संबंधित सात कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये तुमचे नाव आले असून, तुमच्या बँक खात्यात संशयास्पद रक्कम जमा झाल्याचा दावा त्याने केला. या व्यवहारातून कमिशन मिळाल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे अग्रवाल यांच्यावर अटकेची भीती दाखवत दबाव निर्माण करण्यात आला.
यानंतर व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर पोलीस गणवेशातील एका व्यक्तीने स्वतःची ओळख आयपीएस रणबीर सिंह अशी करून दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे अटक वॉरंट असल्याचे भासवणारी कागदपत्रे आणि तपास यंत्रणांशी संबंधित छायाचित्रे पाठवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या माध्यमातून अटकेची भीती अधिक वाढवण्यात आली.
विशेष म्हणजे, या काळात अग्रवाल यांना चार दिवस सतत संबंधितांच्या संपर्कात राहण्यास सांगण्यात आले. दर तासाला आपली माहिती देणे, घराबाहेर जाण्यापूर्वी परवानगी घेणे, अशा सूचना देऊन त्यांच्यावर मानसिक दबाव ठेवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस कारवाईची भीती आणि सातत्याने होणाऱ्या व्हिडिओ कॉलमुळे ते या सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकले.
१४ ऑक्टोबर रोजी या भामट्यांनी बँक खात्यांची रिझर्व्ह बँकेमार्फत पडताळणी करायची असल्याचे सांगितले. त्यासाठी १४ लाख रुपये आरटीजीएसद्वारे पाठवण्यास सांगण्यात आले. ही रक्कम अवघ्या सहा तासांत परत मिळेल, असे आश्वासनही देण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून अग्रवाल यांनी बँक ऑफ इंडियाच्या भंडारा शाखेतील ‘सुमित चायनीज कॉर्नर’ या नावाच्या खात्यात १४ लाख रुपये हस्तांतरित केले.
व्यवहाराची पावती संबंधितांना पाठवल्यानंतर रात्री आठ वाजता त्यांच्याकडून ‘Noted’ असा शेवटचा संदेश आला. त्यानंतर मात्र फोन आणि संपर्क पूर्णपणे बंद झाला. काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अग्रवाल यांनी सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रार दाखल केली.
या प्रकरणी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६ (क), ६६ (ड) तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम २०४, २०५, ३१८(२), ३१८(४) आणि ३१९(२) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक गजानन वसंत कांबळे यांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे देऊळगाव राजा परिसरात सायबर फसवणुकीबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः पोलीस अधिकारी, तपास यंत्रणा किंवा न्यायालयाच्या नावाने फोन करून अटकेची धमकी देणे आणि बँक खात्यांची पडताळणी करण्याच्या बहाण्याने पैसे मागणे, अशा प्रकारांपासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.
सायबर भामट्यांच्या धमक्यांना बळी पडू नका! कोणताही पोलीस अधिकारी किंवा तपास यंत्रणा व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवरून नागरिकांना पैसे पाठवण्यास सांगत नाही. अशा प्रकारचा फोन आल्यास घाबरून जाऊ नका, कोणत्याही खात्यात पैसे हस्तांतरित करू नका आणि तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधा. आर्थिक फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवा!
संबंधित बातम्या वाचण्यासाठी
- देऊळगाव राजा शहरात भरदिवसा चोरी; आधार अपडेट करण्यासाठी दुकानात गेले अन् दुचाकीच्या डिक्कीतून १.८० लाख लंपास!
- दुसऱ्या ग्रामपंचायतीचा पदभारही नाही, तरी डोणगावचा पदभार घेण्यास नकार; गजानन मवाळ यांच्या भूमिकेने प्रशासकीय पेच!
- अमडापुरात गोठ्यात सुरू होता अवैध गर्भलिंग निदानाचा प्रकार! तीन जिल्ह्यांच्या पथकाची संयुक्त कारवाई; पिता-पुत्रासह तिघांना अटक
बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडींसाठी आत्ताच भेट द्या 👉 KattaNews.in
Katta News – बातमी आपल्या गावाची, आवाज आपल्या माणसांचा!










