चिखली| विशाल गवई
खडकपूर्णा प्रकल्प धरणातील अवैध रेती उपसा आणि बोटींची वाहतूक सुरू असताना शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या मोटारी बंद करण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करत खडकपूर्णा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाला ठाम इशारा दिला आहे. ऊस, अद्रक आणि हळद या पिकांची काढणी पूर्ण होईपर्यंत किमान एक महिना मोटारी सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे मोटारी बंद करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न पुन्हा निष्फळ ठरला.
खडकपूर्णा प्रकल्प परिसरात शेतकऱ्यांच्या मोटारी बंद करण्यासाठी खडकपूर्णा प्रकल्पाचे शाखा अभियंता राजगुरू आणि अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शकरगे यांनी प्रयत्न केले. मात्र, परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत या कारवाईला विरोध केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांशी चर्चा करावी लागली. या चर्चेदरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या आणि अडचणी अधिकाऱ्यांसमोर स्पष्टपणे मांडल्या.
ज्या खडकपूर्णा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी, घरे आणि संसाराचा त्याग केला, त्याच प्रकल्पाच्या पाण्यावर शेती करण्याची वेळ आली असताना सर्वप्रथम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्याच मोटारी बंद करण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. प्रकल्प उभारणीसाठी मोठा त्याग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार प्रशासनाने करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर भूमिका मांडताना सर्वप्रथम धरणातील बोटींची वाहतूक आणि अवैध रेती उपसा बंद करण्याची मागणी केली. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी धरणात गेलेल्या नाहीत, त्यांच्या मोटारींबाबतही आधी कारवाई करावी आणि त्यानंतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मोटारींच्या प्रश्नावर चर्चा करावी, असे त्यांनी सांगितले. प्रकल्पासाठी ज्यांनी सर्वस्व गमावले, त्यांच्यावरच सर्वप्रथम कारवाईचा बडगा का उगारला जात आहे, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.
सध्या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात ऊस, अद्रक आणि हळद ही पिके उभी आहेत. या पिकांची काढणी होण्यासाठी आणखी काही कालावधी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत अचानक मोटारी बंद केल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे धरणातील रेती उपसा आणि बोटींची वाहतूक तातडीने बंद करणे शक्य नसेल, तर किमान पुढील एक महिना तरी शेतीच्या मोटारी सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
मोटारी बंद करण्यासाठी प्रशासन तत्परता दाखवत असेल, तर धरणातील अवैध रेती उपसा आणि बोटींची वाहतूक रोखण्यासाठीही अशीच तत्परता का दाखवली जात नाही, असा थेट सवाल शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना केला. रेती उपशामुळे धरणातील पाण्याच्या पातळीवर परिणाम होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात प्रशासनाकडून समान निकष लावले जात नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
चर्चेदरम्यान अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शकरगे यांनी कायदेशीर कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याबाबत भूमिका मांडली. त्यावर शेतकऱ्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली. अवैध रेती उपशात सहभागी असलेल्या बोटींचे चालक आणि संबंधित व्यक्तींवर आतापर्यंत किती गुन्हे दाखल करण्यात आले, प्रत्यक्षात किती कारवाई झाली आणि वारंवार आश्वासने देऊनही हा प्रश्न कायम का आहे, असे प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले. शेतकऱ्यांच्या बाबतीत कायद्याची तत्परतेने अंमलबजावणी होत असेल, तर अवैध रेती उपशाच्या प्रकरणातही तितकीच कठोर भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
या बैठकीत युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर यांनी धरणातील पाण्याच्या पातळीबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले. धरणातील पाणी कमी होण्यामागे केवळ शेतकऱ्यांच्या मोटारी कारणीभूत नसून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या रेती उपशाचाही विचार केला पाहिजे, असे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. या मुद्द्यावर उपस्थित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.
अखेर शेतकऱ्यांची ठाम भूमिका आणि विरोध लक्षात घेता अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय कळविण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे या बैठकीत मोटारी बंद करण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. मात्र, ऊस, अद्रक आणि हळद पिकांची काढणी होईपर्यंत मोटारी सुरू ठेवाव्यात आणि त्याआधी धरणातील अवैध रेती उपसा व बोटींच्या प्रश्नावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडली.
या बैठकीला युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर, मंडपगावचे सरपंच सचिनभाई कदम, चिंचखेडचे सरपंच रामेश्वर वायाळ यांच्यासह इसरूळ, चिंचखेड, मंडपगाव परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खडकपूर्णा प्रकल्पातील मोटारी बंद करण्याचा प्रश्न आणि धरणातील अवैध रेती उपशाचा मुद्दा यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी कायम आहे. प्रशासनाने या दोन्ही प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता खडकपूर्णा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
📲 आपल्या परिसरातील ताज्या बातम्या मिळवण्यासाठी Katta News WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
संबंधित बातम्या
बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडींसाठी आत्ताच भेट द्या 👉 https://kattanews.in/
Katta News – बातमी आपल्या गावाची, आवाज आपल्या माणसांचा!










