KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

अमडापुरात गोठ्यात सुरू होता अवैध गर्भलिंग निदानाचा प्रकार! तीन जिल्ह्यांच्या पथकाची संयुक्त कारवाई; पिता-पुत्रासह तिघांना अटक

On: November 22, 2026 12:10 PM
Follow Us:
अमडापूर शिवारात गोठ्यात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान प्रकरणात तीन जिल्ह्यांच्या पीसीपीएनडीटी पथकाची संयुक्त कारवाई

बुलढाणा / विशाल गवई 

KattaNews जाहिरात 1

शेतातील गोठा, टीनपत्र्याचे छत आणि आत सुरू असलेली सोनोग्राफी… अमडापूर शिवारात अवैध गर्भलिंग निदानाचा प्रकार सुरू असल्याचे समोर आल्यानंतर अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांच्या संयुक्त पीसीपीएनडीटी पथकाने छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईत शेतमालक पिता-पुत्रासह वाशीम येथील एका व्यक्तीला अटक करण्यात आली. घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

KattaNews जाहिरात 2

या प्रकरणात अमडापूर येथील गणेश शंकरराव सूर्यवंशी, त्याचा मुलगा श्रेयस गणेश सूर्यवंशी आणि वाशीम येथील राहुल नामदेव इंगळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय वाशीम येथील एजंट शेख जमील याचे नावही तपासात समोर आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

KattaNews जाहिरात 3

पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साह्याने बोगस डॉक्टर आणि एजंटांची टोळी वेगवेगळ्या ठिकाणी अवैध गर्भलिंग निदान करीत असल्याची माहिती पीसीपीएनडीटी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आरोग्य उपसंचालक डॉ. आरती कुलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डिकॉय केस तयार करून सापळा रचण्यात आला. संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून पथकाने तपास सुरू केला होता.

KattaNews जाहिरात 4

अमडापूर ते लव्हाळा मार्गावरील गणेश सूर्यवंशी यांच्या शेतात पथक पोहोचले असता, तेथील टीनपत्र्याच्या गोठ्यात गर्भलिंग निदानासाठी सोनोग्राफी सुरू असल्याचे आढळले. डिकॉय केसच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू असतानाच पथकाने छापा टाकला. सकाळपासून सुरू असलेली ही कारवाई दुपारी दोन वाजता निर्णायक टप्प्यावर पोहोचली. घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह संबंधित साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणी चिखली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमर सय्यद यांच्या तक्रारीवरून अमडापूर पोलिसांनी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात कथित बोगस डॉक्टरची भूमिका आणि इतर संभाव्य सहभागी व्यक्तींचा शोध घेणे पोलिसांसमोर महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे तपासात आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे.

आरोग्य उपसंचालक डॉ. आरती कुलवाल, बुलढाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि वाशीमचे डॉ. अनिल कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकात डॉ. अनुप चौधरी, डॉ. सोनाली तायडे, विधी समुपदेशक ॲड. शुभांगी ठाकरे, ॲड. राधा नरवालिया, ॲड. वंदना काकडे, डॉ. राहुल डोंगरे, डॉ. उमेश सावजी, अधिपरिचारिका किरण जाणूनकर, पीसीपीएनडीटी विभागाचे ज्ञानेश्वर मुळे यांच्यासह वाशीम स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष वाघ, तेजस्विनी खोडके, सुनील तायडे आणि अमडापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारचा पीसीपीएनडीटी कायदा लागू आहे. गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणेनंतर लिंगनिवड करणे तसेच गर्भाचे लिंग सांगणे कायद्याने प्रतिबंधित आहे. अशा बेकायदेशीर प्रकारांमुळे मुलींच्या जन्माबाबतचा सामाजिक समतोल बिघडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे अमडापुरातील या कारवाईकडे केवळ एका गुन्ह्याचा पर्दाफाश म्हणून नव्हे, तर अवैध गर्भलिंग निदानाविरोधातील महत्त्वाची कारवाई म्हणून पाहिले जात आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अवैध गर्भलिंग निदानाच्या या प्रकारामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.

📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या सर्वप्रथम मिळवा!

✅ Katta News WhatsApp ग्रुप जॉइन करा

कट्टा न्यूज – बातमी आपल्या गावाची, आवाज आपल्या माणसांचा!

बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडींसाठी आत्ताच भेट द्या 👉 KattaNews.in

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a comment