साखरखेर्डा (बुलढाणा) | समाधान सरकटे
परिसरात तापाच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे. काही दिवसांपूर्वी पिंपळगाव सोनारा येथील आठ वर्षीय बालकाचा तापानंतर मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता साखरखेर्डा येथील १६ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ किरण इंगळे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो श्री शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत होता. गेल्या दहा दिवसांपासून तापाशी झुंज देणाऱ्या सिद्धार्थची १३ नोव्हेंबर रोजी सकाळी प्राणज्योत मालवली. या घटनेने साखरखेर्डा परिसरात शोककळा पसरली असून, तापाच्या या घटनांचे नेमके कारण शोधण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
साखरखेर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप आश्रू इंगळे यांचा पुतण्या सिद्धार्थ किरण इंगळे (वय १६) याला गेल्या दहा दिवसांपासून सतत ताप येत होता. त्याच्यावर साखरखेर्डा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच १३ नोव्हेंबर रोजी सकाळी त्याची प्रकृती साथ देऊ शकली नाही आणि त्याचा मृत्यू झाला.
सिद्धार्थ हा श्री शिवाजी हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. काही वर्षांपूर्वीच त्याच्या वडिलांचे छत्र हरवले होते. त्यानंतर आई त्याचा सांभाळ करून त्याचे शिक्षण आणि भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करीत होती. मात्र, मुलाच्या अकाली निधनाने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिद्धार्थच्या निधनाची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पिंपळगाव सोनारा येथील स्वराज कैलास गवई (वय ८) या बालकाचाही तापानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याला चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, ताप नियंत्रणात येत नसल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा सल्ला दिला होता. परंतु, पुढील उपचार सुरू होण्यापूर्वीच या बालकाचाही मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, परिसरात गेल्या तीन महिन्यांत अशाच प्रकारच्या तापानंतर पाच महिलांचा मृत्यू झाल्याची माहितीही स्थानिक पातळीवर समोर येत आहे. मात्र, या सर्व मृत्यूंचे कारण एकच आहे का, याबाबत अधिकृत वैद्यकीय निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे साखरखेर्डा आणि परिसरातील तापाच्या घटनांमागील नेमके कारण काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सतत ताप येणाऱ्या रुग्णांचे वेळेत निदान होत आहे का? आवश्यक त्या रक्त तपासण्या आणि इतर वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत का? तसेच रुग्णांना योग्य वेळी पुढील उपचारांसाठी पाठवले जात आहे का? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने या घटनांची गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
साखरखेर्डा व परिसरातील गावांमध्ये तापाच्या रुग्णांचे तातडीने सर्वेक्षण करावे, संशयित रुग्णांची आवश्यक वैद्यकीय तपासणी करावी, मृत्यूंच्या कारणांचा वैद्यकीय पातळीवर शोध घ्यावा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधे व उपचारांची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे.
सिद्धार्थ किरण इंगळे याच्या निधनाने साखरखेर्डा परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या कुटुंबीयांप्रती नागरिकांकडून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. सिद्धार्थचा रक्षा विसर्जन कार्यक्रम १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता त्याच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला आहे.
साखरखेर्डा परिसरातील तापाच्या घटनांमागील कारणांचा शोध घेऊन आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करीत आहेत.
📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी कट्टा न्यूजशी जोडलेले राहा!
स्थानिक बातम्या, आरोग्य, शेती, राजकारण आणि महत्त्वाचे अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
आपल्या परिसरातील आरोग्यविषयक समस्या, नागरिकांच्या अडचणी आणि महत्त्वाच्या स्थानिक घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचवा. जबाबदार आणि स्थानिक पत्रकारितेसाठी कट्टा न्यूजला सहकार्य करा.
बातमी शेअर करा आणि आपल्या परिसरातील नागरिकांपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवा.
वाचा संबंधित बातम्या
- टँकर हटवताना थांबली वाहने, मागून आला भरधाव ट्रक अन् 15 वाहनांना चिरडले! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
- एका इन्स्टा स्टोरीची किंमत जीव देऊन चुकवावी लागली! मेहकर तालुक्यात पिता-पुत्राला मारहाण; वडिलांचा मृत्यू, १५ आरोपी अटकेत, २० जणांविरुद्ध गुन्हा
- पाणी मिळाले, पण राजकीय पोळी भाजली कुणाची?पेनटाकळीच्या संघर्षाचा राजकीय पंचनामा!










