लोणार : विनायक कुटे
स्मार्ट मीटर बसविण्याच्या मुद्द्यावरून लोणार तालुक्यातील सुलतानपूर परिसरात नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती थांबवावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख नागवंशी संघपाल पनाड यांनी दिला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री तसेच महावितरणच्या लोणार कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे. सुलतानपूरसह लोणार तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असून ती तात्काळ थांबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या वतीने स्मार्ट मीटर बसवू नयेत, यासंदर्भात ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. ग्रामसभेचा ठराव झालेला असतानाही स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
महावितरणचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांवर दबाव आणत असून स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध केल्यास गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, नागरिकांवर कोणताही दबाव आणू नये आणि ग्रामसभेच्या ठरावाची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी बुलढाणा, महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा, तहसीलदार लोणार आणि पोलीस निरीक्षक मेहकर यांना देण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी नागवंशी संघपाल पनाड, अनित्य घेवंदे, अख्तर भाई, दामुअण्ण सुरूशे, पुरुषोत्तम गाडेकर, डॉ. देसाई, गोविंद मंत्री, सुखदेव देसाई, संतोष शिंदे, संतोष पाटील, अमीर भाई, सद्दाम भाई, गणेश रत्नपारखी, असिम पठाण, दामोधर कुकडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. निवेदनावर शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असल्याचेही सांगण्यात आले.
📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
वाचकांसाठी महत्त्वाचे :
लोणार तालुक्यात स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून नागरिकांनी महावितरणकडे सक्ती थांबविण्याची मागणी केली आहे. याबाबत प्रशासन आणि महावितरणकडून पुढील काळात काय भूमिका घेतली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या
- लोणार शहरात भरदिवसा धाडसी चोरी; चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले अन् काही मिनिटांतच स्कॉर्पिओची काच फोडून साडेतीन लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार
- रोखताना बेफाम टिप्पर अन् तहसीलदारांनाच चिरडण्याचा प्रयत्न? अंढेरा फाट्यावर नेमकं काय घडलं?
- मांडवा उपकेंद्राच्या CHO ची झेंडावंदनानंतर आत्महत्या; NQAS मूल्यांकनाच्या दबावाचा आरोप
टीप : या बातमीतील आरोप व दावे संबंधितांनी दिलेल्या निवेदनावर आधारित आहेत. संबंधित प्रशासन किंवा महावितरणची अधिकृत भूमिका उपलब्ध झाल्यास ती स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.










