बुलडाणा | भागवत गायकवाड
पहाटे गोठा उघडला आणि आत असलेल्या शेळ्या गायब असल्याचे समोर आले. हतेडी बु. ता. बुलडाणा शिवारात एकाच रात्रीत तब्बल 18 शेळ्या चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमुळे शेळीपालकांमध्ये खळबळ उडाली असून, चोरी गेलेल्या शेळ्यांची एकूण किंमत अंदाजे 85 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी उदय भास्कराव देशपांडे (वय 59, रा. केशव नगर, बुलडाणा) यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी FIR क्रमांक 0332/2026 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
उदय देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार, हतेडी बु. शिवारातील केसापूर रोडवरील गट क्रमांक 276 मध्ये त्यांची चार एकर शेती आहे. या शेतात शेळ्या आणि गुरांसाठी गोठा बांधण्यात आला असून, गोठ्यात त्यांच्या मालकीच्या 6 शेळ्या होत्या. त्यांच्या शेतावर काम करणारे संदीप फकीरा झिने हे कुटुंबासह शेतातील शेडमध्ये राहत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
17 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे सुमारे 5:15 वाजता संदीप झिने हे गोठ्याची साफसफाई करण्यासाठी गेले असता गोठ्यातील सहा शेळ्या दिसल्या नाहीत. त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र शेळ्या मिळून आल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी फोन करून उदय देशपांडे यांना घटनेची माहिती दिली.
दरम्यान, तांदुळवाडी येथील योगेश वसंतराव ढवळे यांच्या मालकीच्या गोठ्यातूनही 12 शेळ्या चोरीला गेल्याचे समोर आले. या शेळ्या तांदुळवाडी बसस्टँडजवळ राहुल म्हस्के यांच्या प्लॉटमध्ये उभारलेल्या टिनशेडमध्ये ठेवण्यात आल्या होत्या.
उदय देशपांडे, योगेश ढवळे आणि संदीप झिने यांनी परिसरात शोध घेतला. मात्र एकूण 18 शेळ्यांचा ठावठिकाणा लागला नाही. देशपांडे यांच्या 6 शेळ्यांची अंदाजे किंमत 30 हजार रुपये, तर योगेश ढवळे यांच्या 12 शेळ्यांची किंमत अंदाजे 55 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादीनुसार, 17 ऑगस्ट रोजी रात्री 1 ते पहाटे 5:15 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या शेळ्या चोरी करून नेल्याचा संशय आहे. या घटनेत एकूण 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. चोरीच्या या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
📲 बुलडाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.










