Buldana news : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे. अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवे राजकीय समीकरण पाहायला मिळत आहे. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि ना. प्रतापराव जाधव यांच्या ‘सहकार’ पॅनलसमोर आ. मनोज कायंदे यांनी स्वतंत्र ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ उभे केले आहे. त्यामुळे उर्वरित जागांसाठी होणाऱ्या लढतीकडे विशेष लक्ष लागले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ‘सहकार’ पॅनलच्या १२ जागा अविरोध झाल्या आहेत. आता उर्वरित आठ मतदारसंघांतील नऊ जागांसाठी २३ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. या नऊ जागांवर ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ने उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीला आता वेगळे वळण मिळाले आहे.
आ. मनोज कायंदे यांनी सोमवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वतंत्र पॅनल उभे करण्याची घोषणा केली. यावेळी मनोज दांगडे, संतोष खांडेभराड, विजयसिंह राजपूत, मनीष बोरकर, दिपक चेके, नितीन कायंदे आणि सदाशीव मुंडे आदी उपस्थित होते.
जिल्हा बँक आर्थिक अडचणीत असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बँकेला ३०० कोटी रुपयांचे सुलभ कर्ज उपलब्ध करून दिल्याने बँकेला उभारी मिळाली, असा दावा आ. मनोज कायंदे यांनी केला. बँक आता सुमारे २४ कोटी रुपयांच्या नफ्यात आली असतानाही अजित पवार यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत प्रतिनिधित्व नाकारण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“आम्ही चार ते पाच जागांची मागणी केली होती. मात्र, एकाही नावाचा विचार झाला नाही. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी स्वतंत्र पॅनल उभे करावे लागले,” असे आ. कायंदे यांनी सांगितले.
सोसायट्यांच्या मतदान प्रतिनिधींचे ठराव करताना सभासदांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. काही ठराव आणि स्वाक्षऱ्यांबाबत संशय असल्याचे सांगत प्रचारादरम्यान यासंबंधीची माहिती समोर आणली जाईल, असे कायंदे यांनी स्पष्ट केले.
‘परिवर्तन’ पॅनलच्या उमेदवारांवर दबाव आणणे, त्यांना माघारीसाठी धमकावणे तसेच दिशाभूल करणारे ध्वनिचित्रण तयार करण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोपही कायंदे यांनी केला. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
“मी स्वतः मतदार किंवा उमेदवार नाही. सत्तेचे विकेंद्रीकरण आणि सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी या पॅनलला पाठिंबा दिला आहे,” असे कायंदे यांनी स्पष्ट केले.
आ. मनोज कायंदे यांच्या या स्वतंत्र भूमिकेमुळे आधीच १२ जागा अविरोध झालेल्या ‘सहकार’ पॅनलसमोर उर्वरित नऊ जागांवर राजकीय आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे २३ ऑगस्ट रोजी होणारे मतदान जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पुढील राजकीय चित्र स्पष्ट करणारे ठरणार आहे. इतर जिल्ह्यांमध्येही या निवडणुकीतील राजकीय घडामोडीकडे लक्ष लागले आहे.
‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’चे उमेदवार : महिला राखीव मतदारसंघासाठी मंदाकिनी चांभारे पाटील आणि प्रतिभा विनायक टाले, अनुसूचित जाती मतदारसंघासाठी योगेश गायकवाड, ओबीसी मतदारसंघासाठी मनोज दांगडे, वैयक्तिक मतदारसंघासाठी ज्ञानेश्वर पुरुषोत्तम पाटील आणि इतर सहकारी संस्था मतदारसंघासाठी उज्वला गणेश मोरे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
तसेच लोणार सोसायटी मतदारसंघासाठी शिवनंदा रामकिसन खंड, तर मलकापूर सोसायटी मतदारसंघासाठी शिवचंद्र तायडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
📲 Buldana News चे Live अपडेट थेट WhatsApp वर मिळवा!
बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
📰 Related News
- शेगाव रेल्वे स्थानकाचे नाव ‘श्री गजानन महाराज शेगाव स्टेशन’ करण्याची मागणी; प्रतापराव जाधवांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भेट
- बुलढाण्यात खळबळ! ‘राजीनामा दे, नाहीतर संपवून टाकू’चा आरोप; करमोड्याच्या सरपंचाचा मृत्यू ,आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ चर्चेत
- राहुलभाऊ गप्प… चिखलीच्या राजकारणात मात्र मोठ्या हालचाली; भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा ऐरणीवर










