साखरखेर्डा (वार्ताहर)| १४ मार्च २०२६ :
बुलढाणा जिल्ह्यातील मोहाडी गावालगत असलेल्या पाझर तलाव परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकरी आणि मजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज १३ मार्च रोजी सकाळी १० ते ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
मोहाडी येथील बबनराव रिंढे यांच्या शेताजवळील पाझर तलावात बिबट्या आढळून आल्याने शेतात काम करणाऱ्या महिला व पुरुषांनी घाबरून घराकडे धाव घेतली. अचानक बिबट्या दिसल्यामुळे काही काळ परिसरात एकच गोंधळ उडाला.
ग्रामपंचायत कर्मचारी पाणीपुरवठा विहिरीवरील जळालेला मोटारपंप बसवण्यासाठी तलावाजवळ गेले असता पाणी पिण्यासाठी आलेला बिबट्या त्यांच्या नजरेस पडला. अचानक बिबट्या दिसल्याने कर्मचाऱ्यांची पाचरच बसली. त्यांनी आरडाओरड करताच बिबट्याने तेथून पळ काढला.
ग्रामस्थांनी लाठ्या-काठ्या घेऊन बिबट्याचा पाठलाग केला असता तो कोराडी नदीच्या दिशेने दत्ता पाटील सुरुशे यांच्या शेतातून पळून गेला. विलास आबा रिंढे आणि गावातील काही नागरिकांनी बिबट्याला परिसरातून हाकलून लावल्याचे सांगितले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी शिंदी परिसरातील चंदनपूर पाझर तलावाजवळही बिबट्याचा वावर आढळून आला होता. त्या ठिकाणी दोन कुत्रे आणि एका माकडाची शिकार केल्याची घटना घडली होती. याबाबत देऊळगाव राजा वन अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती, मात्र त्याकडे फारशी दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मोहाडी परिसरात सध्या गहू, हरभरा, मका आणि कांदा बिजवाई यांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. दाट पिकांमुळे बिबट्याचा शोध घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या मजूर व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने तातडीने दखल घेऊन या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी मोहाडी गावातील नागरिकांनी केली आहे.
फोटो : तलाव परिसरात बिबट्या आढळून आल्यानंतर ग्रामस्थांनी लाठ्या-काठ्या घेऊन हाकलून लावतानाचा प्रसंग.
Related News
- बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवसात ६ अल्पवयीन मुली बेपत्ता
- जमीन महसूल थकबाकीवर मोठी कारवाई; सिंदखेडराजा तहसील कार्यालयात 17 मार्चला मालमत्तेचा जाहीर लिलाव
- एसटीमध्ये मेगा भरती! १७,७४२ चालक-वाहक पदांसाठी मोठी संधी; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
Call To Action :
अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत रहा.












