लोणार | ७ फेब्रुवारी २०२६
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे Syngenta या नामांकित कंपनीच्या नावाखाली बनावट कीटकनाशक विक्रीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. Isabion बनावट औषध तसेच महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या कृषी रसायनांची खुलेआम विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छीरे यांनी केली आहे.
या संदर्भात कृषिमंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांना तहसीलदार लोणार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे. लोणार शहर व परिसरात काही स्थानिक कृषी सेवा केंद्रांमधून नामांकित कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट आणि प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील संबंधित कंपनीने पोलिसांच्या मदतीने सापळा रचून लोणारमधील एका विक्रेत्याकडून २९,००८ रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कारवाई झाली असली तरी स्थानिक पातळीवर काही हितसंबंधी व्यक्ती या प्रकरणात तडजोड करून ते दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका व्यक्त होत आहे.
ही बनावट कीटकनाशके पिकांवरील किडीचे नियंत्रण करत नसून उलट पिके जळून जाण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत असून मानसिक तणावात वाढ होत आहे. बळीराजाच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या माफियांवर तातडीने कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे डॉ. बच्छीरे यांनी नमूद केले आहे.
निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत –
- या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत
- लोणार व परिसरातील सर्व कृषी सेवा केंद्रांची भरारी पथकाद्वारे आकस्मिक तपासणी करावी
- कोणत्याही दबावाखाली हे प्रकरण दडपले जाऊ नये
- बनावट कीटकनाशक माफियांवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा
यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शहर प्रमुख गजानन जाधव, तालुका निवडणूक समन्वयक सुदन अंभोरे, शहर संघटक तानाजी मापारी, युवा शहर प्रमुख श्रीकांत मदनकर, अल्पसंख्याक विभागाचे इकबाल कुरेशी, अवेस कुरेशी, अशपाक खान यांचा समावेश होता.
📢 शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्यांसाठी Kattanews.in वाचत रहा
आपल्या भागातील अन्याय, फसवणूक किंवा समस्या आम्हाला कळवा.
🔗 Related News













