चिखली|२४ जानेवारी २०२६
पाटोदा (ता. चिखली) येथे आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चिखली आगाराची पेन सावंगी–चिखली ही नियमित धावणारी एसटी बस गावातून जात असताना अरुंद वळणावरून जाणाऱ्या मोटरसायकलला धडकली.
या अपघातात मोटरसायकलवरील मागे बसलेले भास्कर विष्णू खंदारे (वय ६५) हे गंभीर जखमी झाले असून मोटरसायकल चालक भिकाजी काकफळे (वय ३५) यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, संबंधित एसटी बस वेगात चालवली जात होती. गावाचा रस्ता अरुंद असून अपघाताच्या ठिकाणी वळण आहे. बसच्या बाजूला सुमारे १२ इंचाचा लोखंडी पत्रा बाहेर निघालेला होता. हाच पत्रा भास्कर खंदारे यांच्या अंगाला लागल्याने ते रस्त्यावर फेकले गेले आणि भीषण अपघात झाला.
अपघातानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत एसटी बसची अवस्था अत्यंत खराब व अनफिट असल्याचा आरोप केला आहे. अशा धोकादायक स्थितीत असलेल्या बसेस रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
📌 नागरिकांसाठी आवाहन
आपल्या परिसरातील अनफिट वाहने, धोकादायक बस सेवा किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यास तत्काळ प्रशासन व पोलिसांना कळवा. तुमची जागरूकता अनेकांचे प्राण वाचवू शकते.
🔔 Kattanews.in वर अपडेट राहा
अशाच स्थानिक, सामाजिक, गुन्हेगारी व राजकीय बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.
ताज्या बातम्यांसाठी आमचे WhatsApp व सोशल मीडिया पेज फॉलो करा.
📰 Related News










