देऊळगाव राजा : मनोहर खंदारे
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त श्री बालाजी संस्थान संचलित श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ‘महात्मा गांधीजींचे सत्य व अहिंसाविषयक विचार’ या विषयावर प्रा. डॉ. अनंत आवटी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागप्रमुख डॉ. एन. एच. शेगोकार होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. अनंत आवटी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमापूजनाने झाली. कु. गायत्री राऊत हिने प्रास्ताविक व अतिथी परिचय करून दिला. विद्यार्थिनी कु. रुद्रानी रामपूरकर हिने महापुरुषांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले.
प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अनंत आवटी यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनमूल्यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला. गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या विचारांवर मार्गदर्शन करताना सत्य आणि अहिंसा ही केवळ राजकीय आंदोलनाची साधने नसून व्यक्तीला आत्मिक बळ देणारी जीवनशैली असल्याचे त्यांनी सांगितले.
गांधीजींच्या बालपणीच्या प्रसंगांचा संदर्भ देत त्यांनी ‘सत्य हेच ईश्वर’ या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट केला. अहिंसेचे विविध पैलू समजावून सांगताना त्यांनी ‘भित्र्यांची अहिंसा’, ‘दुर्बळांची अहिंसा’ आणि ‘शूरवीरांची अहिंसा’ यातील फरकही विद्यार्थ्यांसमोर मांडला. अन्याय सहन न करता नैतिक अधिष्ठान आणि आंतरिक सामर्थ्याच्या जोरावर त्याला सामोरे जाणारी अहिंसा हीच खरी ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लालबहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करताना डॉ. आवटी यांनी त्यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि चारित्र्यसंपन्नतेचे विशेष कौतुक केले. शास्त्रीजी हे गांधीवादी मूल्यांचे मूर्तिमंत प्रतीक होते. त्यांनी दिलेला ‘जय जवान, जय किसान’ हा नारा केवळ घोषणा नसून देशाच्या स्वावलंबनाचा आणि स्वाभिमानाचा मूलमंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या तरुण पिढीने गांधीजींचे सत्य-अहिंसेचे तत्त्वज्ञान आणि शास्त्रीजींची कर्तव्यनिष्ठा यांचा मेळ घालून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन प्रा. डॉ. अनंत आवटी यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. एन. एच. शेगोकार यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणासह गांधीजींच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली. गांधीजींचे आत्मचरित्र ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे पारदर्शकता आणि प्रामाणिकतेचा वस्तुपाठ असून नव्या पिढीने त्यातून प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.
हा कार्यक्रम श्री बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव आणि प्राचार्य डॉ. डी. व्ही. गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. राजेंद्रसिंग देवरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रामेश्वर माने यांनी केले, तर आभार प्रा. ए. के. राठोड यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
📲 KattaNews च्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
📰 Related News










