चिखली |१२ फेब्रुवारी २०२६
वैदुवाडी जि.प. शाळेत बोगस विद्यार्थी दाखवून शासनाचे अनुदान उचलल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणातील चौकशी अहवाल सादर होऊनही कारवाई न झाल्याने संशय निर्माण झाला आहे. बोगस विद्यार्थी, अनुदान घोटाळा, चौकशी अहवाल, 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी आणि 23 फेब्रुवारीपासून उपोषणाचा इशारा यामुळे चिखली पंचायत समिती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
माहिती अधिकारातून प्राप्त माहितीनुसार, पंचायत समिती चिखली अंतर्गत जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, वैदुवाडी येथे वर्ग 1 ते 4 साठी कागदोपत्री 8 विद्यार्थी दाखवण्यात आले. मात्र संबंधित विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत उपस्थित नसून ते इतर शाळेत शिक्षण घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या नावावर गणवेश, बूट-सॉक्स, शालेय पोषण आहार व पुस्तके यांची अनुदाने उचलून वाटप झाल्याचे दाखवून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद आहे.
प्रकरण प्रसिद्ध झाल्यानंतर गठित चौकशी समितीने तपास करून अहवाल दि. 02/01/2026 रोजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चिखली यांच्याकडे सादर केला. त्यानंतर दि. 05/01/2026 रोजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. बुलढाणा यांच्याकडे दोषी धरत अहवाल सादर करण्यात आल्याचे नमूद आहे. मात्र या चौकशी अहवालावर पुढील स्तरावर कारवाई का झाली नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुख्याध्यापकांनी सेवाकाळात वारंवार अर्जित व आजारी रजा घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्याचे, तसेच नियमबाह्य पद्धतीने पगार काढल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. संबंधितांना वैद्यकीय मंडळासमोर तपासणीसाठी हजर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
भारतीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत डोंगरदिवे यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तक्रार निवेदन देत भा.दं.वि. कलम 420 सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास दि. 23/02/2026 पासून चिखली पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Related News
- ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीवर मोठी मागणी; कार्यरत सरपंचांनाच संधी द्या – आ. श्वेताताई महाले पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ग्रामपंचायतींवर प्रशासक साखरखेर्डाला मोठी भेट! अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर; ३५ वर्षांच्या मागणीला यश
- नापिकीचा घातक फटका! मेरा बु येथे शेतकरी दांपत्याचा विष प्राशन; पतीचा मृत्यू, पत्नी बचावली
👉 अशाच ताज्या, तपासात्मक आणि विश्वसनीय बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या.













