रामदास काहाळे|सिंदखेडराजा
सिंदखेडराजा शहर हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नटराज चौकात असलेल्या ‘क्लासिक बार’ ला मध्यरात्री डिझेल टाकून पेटवून दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
या भीषण आगीत ₹72,500 किमतीचे साहित्य जळून खाक झाले असून, सिंदखेडराजा पोलिसांनी या प्रकरणी विजय रामभाऊ चौधरी या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या घटनेनंतर आरोपीनेच फोनवर कबुली देत “मी तुझ्या मामाच्या बारला आग लावली आहे” असे सांगितल्याने शहरभर खळबळ उडाली आहे.
मध्यरात्री शहरात खळबळ उडवणारी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, घटना २८ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. बारमालक हरिशंकर चौधरी यांना शेजारी सुनील शिलवंत यांनी फोन करून बारमधून धूर येत असल्याची माहिती दिली.
त्यांनी तात्काळ मुलगा स्वप्निल आणि कर्मचारी आकाश यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांच्या मदतीने आग विझवली.
तपासादरम्यान समोर आले की, आरोपी विजय रामभाऊ चौधरी यांनी त्यांच्या ओळखीच्या विजय सातपुते यांना फोनवर सांगितले की, “मी तुझ्या मामाच्या बारला आग लावली आहे.” या वक्तव्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या घटनेचा गुन्हा दाखल केला.
हेही वाचा .
Gold Price Today : एकाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ₹4000 ची घसरण, आजचे नवीन दर जाणून घ्या!
सिंदखेडराजा पोलिसांची तातडीची कारवाई
सिंदखेडराजा पोलिस ठाण्याचे निरीक्षक आशिष इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्यावेळी पोहेका सानप, पोलीस कर्मचारी विकास राऊत आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 326 (आगीने किंवा ज्वलनशील पदार्थाने नुकसान करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिसांचा शोध सुरु आहे.
या घटनेनंतर सिंदखेडराजा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ‘क्लासिक बार’ आग प्रकरणाची चर्चा सर्वत्र होत असून नागरिकांनी पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.










