साखरखेर्डा : समाधान सरकटे
कापूस वेचणीच्या दिवसांत शेतातून उत्पन्न मिळेल, या आशेने शेतकरी कपाशीच्या पिकाची काळजी घेत असताना आता पीकच हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सुरुवातीला पावसाने ओढ दिली आणि त्यानंतर कडक उन्हाचा तडाखा बसल्याने कपाशीची पाती व फुले गळू लागली आहेत. सिंदखेडराजा तालुक्यात तब्बल २० हजार हेक्टर क्षेत्रावरील कपाशी बाधित झाल्याचा दावा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी कपाशीची झाडे वाळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, नुकसानभरपाईच्या अपेक्षेने त्यांचे लक्ष आता पंचनाम्यांच्या प्रक्रियेकडे लागले आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड, राहेरी बुद्रुक, किनगाव राजा, जांभोरा, रुम्हणा, सोयंदेव, चांगेफळ, बोराखेडी गड्डे, सोनुशी, वर्दडी, भोसा, अडगावराजा, सिंदखेडराजा, पिंपळगाव लेंडी, हनवतखेड, पळसखेड चक्का आणि माळसावरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली जाते. या भागातील अनेक शेतकरी मे महिन्यातच कपाशीची लागवड करून ठिबक सिंचनाच्या मदतीने पिकाची वाढ साधण्याचा प्रयत्न करतात.
जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली होती. मात्र, जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने पिकाच्या वाढीचा प्रश्न निर्माण झाला. विहिरींच्या पाणीपातळीवरही परिणाम झाला. त्यानंतर जुलैमध्ये पाऊस झाल्याने कपाशीची लागवड यशस्वी झाल्याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला. मात्र, ऑगस्टमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने पिकाला आवश्यक ओलावा मिळण्यात अडचणी आल्या.
सप्टेंबरमध्ये कपाशीला फुलकळ्या येण्याची वेळ असताना पावसातील खंड आणि वाढत्या तापमानाचा फटका बसल्याचे शेतकरी सांगतात. ऑक्टोबरमध्येही उन्हाचा तडाखा कायम राहिल्याने पाती व फुले गळण्याचे प्रमाण वाढले. काही शेतांमध्ये कपाशीची झाडे वाळू लागली असून, अपेक्षित उत्पादन मिळण्याआधीच पीक हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
साखरखेर्डा, मलकापूर पांग्रा आणि शेंदुर्जन महसूल मंडळातील काही भागांतही कपाशीच्या पिकाची अशीच अवस्था असल्याचे सांगितले जात आहे. बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि सिंचनावर खर्च करूनही पीक संकटात सापडल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. कपाशीचे नुकसान झाल्यास आगामी हंगामाचे आर्थिक नियोजनही बिघडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतांमध्ये महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पाहणी करत आहेत. मात्र, प्रत्येक शेतात जाऊन ऑनलाइन नोंदी करणे आणि पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करणे वेळखाऊ ठरत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. काही ठिकाणी नेटवर्कची अडचण येत असून, ऑनलाइन प्रणाली व्यवस्थित काम करत नसल्याने पाहणीच्या कामात अडथळे येत असल्याचे सांगण्यात येते.
जांभोरा येथील कापूस उत्पादक शेतकरी प्रल्हाद खरात यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. प्रत्यक्ष पीकपेरा आणि उपलब्ध नोंदी विचारात घेऊन महसूल विभागाने योग्य निर्णय घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.
शेतकरी संघटनेचे नेते वामनराव जाधव यांनीही पंचनाम्यांच्या प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली जात असली, तरी ही प्रक्रिया आणखी किती दिवस चालणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यापूर्वीच्या अहवालांचा आधार घेऊन याद्या तयार कराव्यात आणि पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
कपाशीच्या नुकसानीचे अचूक सर्वेक्षण, पात्र शेतकऱ्यांची नोंद आणि मदतीची प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. बाधित क्षेत्राचा अधिकृत आकडा, पंचनाम्यांची सद्यस्थिती आणि नुकसानभरपाईबाबत प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे सिंदखेडराजा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या सर्वप्रथम मिळवा!
शेती, पीक नुकसान, बाजारभाव, शासकीय योजना आणि स्थानिक घडामोडींच्या अपडेटसाठी कट्टा न्यूजच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
📌 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे
तुमच्या गावातही कपाशीचे नुकसान झाले आहे का? पीक परिस्थिती, पंचनामे किंवा शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबतची माहिती आम्हाला कळवा. संबंधित माहिती आणि उपलब्ध छायाचित्रे पाठवताना गावाचे नाव व संपर्क तपशील द्या.
कट्टा न्यूज — स्थानिक प्रश्नांना व्यासपीठ.
📰 संबंधित बातम्या
- जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याची धारदार चाकूने हत्या; सोमठाणा येथील तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण चिखली तालुका हादरला
- देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांडाला नवे वळण; दोन FIR, दोन मृत्यू अन् सर्व आरोपींना 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
- बुलढाण्यात रॉयल एनफिल्ड गोडाऊनला भीषण आग; बुलेटसह स्पेअर पार्ट्स जळाले, १५ लाखांच्या नुकसानीचा अंदाज










