साखरखेर्डा | ६ फेब्रुवारी २०२६
साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हनवतखेड गावात ९२ वर्षीय वयोवृद्ध महिलेकडून चाकूचा धाक दाखवून ८ तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना २९ जानेवारी रोजी रात्री घडली. या गंभीर गुन्ह्यात साखरखेर्डा पोलिसांनी जलद तपास करत दोन आरोपींना अटक केली असून एका महिलेसह दोघे आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुमन श्रीराम चव्हाण (वय ९२, रा. हनवतखेड) या वृद्ध महिला २९ जानेवारी रोजी रात्री घरी एकट्याच झोपेत असताना ३ ते ४ अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील किचनरूमचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. झोपेत असलेल्या आजीच्या कान, हात, नाक व गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी काढण्यास सुरुवात केली.
नाकातील दागिने काढत असताना आजी जागी झाल्याने चोरट्यांनी लेनकटर व चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी दोन्ही हातातील ५ तोळ्यांच्या दोन सोन्याच्या बांगड्या, २ तोळ्याची सोन्याची पोत आणि १ तोळ्याचे कानातील झुमके असा एकूण ८ तोळे सोन्याचा ऐवज चोरून नेला.
सन २००५–०६ च्या बाजारभावानुसार या दागिन्यांची किंमत सुमारे ५६ हजार रुपये असून आजच्या बाजारभावानुसार ही किंमत तब्बल १३ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा प्रकार साधी चोरी नसून थेट दरोड्याचा असल्याचे बोलले जात आहे. नाकातील नथ न निघाल्याने ती चोरट्यांना नेता आली नाही. तसेच घरातील ३२ इंची टीव्ही व रिसीव्हर घराबाहेर नेऊन ठेवण्यात आला होता.
या प्रकरणी फिर्यादी अनिल चव्हाण यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रथम अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३३१ (४), ३३१ (६), ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयावरून करण एकनाथ वंजारे (रा. खेर्डा, ता. मालेगाव, जि. वाशीम) आणि मनोज मोहन इंगळे (रा. सुकंडा, ता. मालेगाव, जि. वाशीम) यांना अटक केली. आरोपींकडून संपूर्ण चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेला करण एकनाथ वंजारे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या एका महिलेसह दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
👉 वाचा आणखी:
- PG करणाऱ्या डॉक्टरची नागपुरात आत्महत्या; हॉटेलमध्ये संपवले आयुष्य, वडिलांचा वारंवार मुलाला फोन
- लोणारमध्ये बनावट कृषी औषधांचा पर्दाफाश; Syngenta कंपनीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक
- पंधराव्या वित्त आयोगाच्या १२ लाखांवर डल्ला; ग्रामसेवक गणेश पायघन निलंबित
📢 हे आवश्यक करा
अशाच ताज्या, सत्य आणि सविस्तर गुन्हेगारी बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या
आणि ही बातमी WhatsApp, Facebook वर शेअर करा.













