नारायणराव आरू पाटील/वाशिम
रिसोड तालुक्यातील मतदारांसाठी मोठी बातमी! आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यंदा १६ नवीन मतदान केंद्रांची वाढ करण्यात आली आहे. प्रशासनाकडून मतदारांना गर्दीमुक्त आणि सुलभ मतदानाचा अनुभव मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे मतदारांना आपल्या गावाजवळच मतदानाची सोय होणार असून मतदान प्रक्रियाही अधिक सुलभ होणार आहे.मागील निवडणुकीत रिसोड तालुक्यात १५२ बूथ होते. या वेळेस १६ बुथची वाढ करून एकूण १६६ बूथ करण्यात आले आहेत, तर २ बूथ कमी केले गेले. परिणामी निव्वळ १४ बूथची वाढ झाली आहे.
ग्रामीण भागात पिंपरी सरहद्द, दापुरी खुर्द, बेलखेडा, रिठद, येवती, पेडगाव, देऊळगाव बंडा, व्याड, घोटा, पळसखेड, सवड, भापूर, एकलासपूर, भर जहागीर, मोप, आणि आगरवाडी येथे नवीन मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार जवादे आणि तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सांगितले की, प्रत्येक मतदान केंद्रावर १२०० मतदारांपेक्षा अधिक मतदार नकोत, यासाठी प्रशासनाने विशेष योजना तयार केली आहे.










