विजय जुंजारे/प्रतिनिधी, रिसोड |
अंधारामुळे रिसोड शहरातील या मुख्य रस्त्यावर अपघात आणि चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पथदिव्यांचा अभाव हे फक्त दुर्लक्ष नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ आहे, असा नागरिकांचा आरोप आहे. दुकानदार, पालक आणि महिला वर्ग सायंकाळीनंतर या भागात जाणं टाळतात.
हे पण वाचा.
रिसोड तालुक्यात बूथ वाढ! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत १६ नवीन मतदान केंद्रांची निर्मिती.
अंधाराचा फायदा घेत काही दिवसांपूर्वी बाजारपेठेतील दुकानांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “रिसोड शहरात लहान गावांप्रमाणे पथदिवे का झगमगत नाहीत?” हा प्रश्न सर्वांच्या तोंडी आहे.
नगरपरिषद आणि संबंधित अधिकारी या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा नागरिकांचा आरोप आहे. कोणीही पुढाकार घेत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल रोष निर्माण झाला आहे. “या पथदिव्यांना नेमकं ग्रहण कोणतं — भ्रष्टाचाराचं की राजकारणाचं?” हा प्रश्न आता तीव्र झाला आहे.
नागरिकांच्या प्रतिक्रिया:
“रिसोड सिव्हिल लाईनचे पथदिवे अनेक वर्षांपासून बंद आहेत. रात्री दुकानात येण्या-जाणाऱ्या लोकांना प्रचंड अडचण होते. आपण शहरात राहतो की खेड्यात, असा प्रश्न पडतो. प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी ही आमची अपेक्षा आहे.”
“रिसोड हे दिग्गज नेत्यांचं गाव आहे, पण विकासाच्या बाबतीत शहर मागे आहे. पथदिवे फक्त नावालाच लावलेत. महिलांना रात्री या रस्त्याने जाणं धोकादायक बनलं आहे. निधीचा गैरवापर आणि राजकारणामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.”
नागरिकांची मागणी:
रिसोड शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे तात्काळ दुरुस्त करावेत, प्रकाश व्यवस्था नियमित ठेवावी, आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी होत आहे.












