देऊळगाव राजा|राहुल नायर
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील पाडळी शिंदे येथे करंट लागून बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, अंढेरा पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र उर्फ छगन तुकाराम मोरे (वय ५५) यांचा मृतदेह ५ ऑगस्ट रोजी सकाळी गाव परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे आढळून आले. याची माहिती पोलीस पाटील भारत शिंदे यांनी अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच गावातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.
या गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नीलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला. ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, श्वान पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे, पोलीस अधिकारी सुरेश जारवाल, नितीन फुसे, पंढरीनाथ नेमाने, किशोर जाधव, सोनकांबळे, विलास काकड, श्वान पथक प्रमुख राजेश पद्मने व त्यांची टीम, फॉरेन्सिक पथक, पोलीस पाटील भारत शिंदे तसेच सरपंचपती राजू ठेंग यांच्यासह अनेक अधिकारी आणि ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते.
या प्रकरणात पोलिसांच्या श्वान पथकातील ‘राणी’ या श्वानाने महत्त्वाची भूमिका बजावली. घटनास्थळी सापडलेल्या रुमालाचा वास घेतल्यानंतर राणी थेट गावाच्या पूर्वेकडे सुमारे ३०० मीटर अंतरावरील एका घरापर्यंत पोहोचली. त्याचबरोबर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आली. या सर्व पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मच्छिद्र माणिकराव सरोदे आणि बळीराम खांबायतकर (वय ३५) या दोघांना अवघ्या दोन तासांत अटक केली.
मृत मच्छिंद्र मोरे यांच्या मुलगी प्रियंका राहुल खरात (रा. पीर कल्याण, जि. जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील पाडळी शिंदे येथे एकटे राहत होते. आई सावखेड तेजन येथे राहत असून भाऊ हिंगोली येथे राहतो. प्रियंका या वडिलांशी मोबाईलवर नियमित संपर्कात होत्या. दोन-तीन दिवसांपूर्वी वडिलांनी त्यांना सांगितले होते की, गावातील मच्छिद्र सरोदे याची बकरी विजेच्या तारेचा करंट लागून मेली असून त्यावरून तो बकरीचे पैसे मागत आहे. मात्र पैसे देण्यास नकार दिल्यानंतर वाद वाढला.
फिर्यादीनुसार, याच रागातून ४ ऑगस्टच्या रात्री ते ५ ऑगस्टच्या पहाटेदरम्यान आरोपींनी मच्छिंद्र मोरे यांना अडवून त्यांच्या डोक्यावर काठ्यांनी वार करत गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ग्रामस्थांना त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
या घटनेमुळे मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मच्छिंद्र मोरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि बहीण असा परिवार आहे. देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.










