मोताळा प्रतिनिधी/प्रवीण गरुडे
मोताळा परिसरात सध्या रेशनमधील धान्याच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.मोताळा तालुक्या मधून मागील सहा ते सात महिन्यांपासून गव्हाऐवजी ज्वारीचे वाटप सुरू असून ही ज्वारी अत्यंत निकृष्ट, भुसा झालेली व खाण्यास अयोग्य असल्याची तक्रार कार्डधारकांकडून केली जात आहे.
रेशन दुकान मधून मिळणारा तांदूळसुद्धा मोठ्या प्रमाणावर चुरी असलेला असून नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे रेशन दुकान व्यवस्थेवर विश्वास उरलेला नसल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे.
धान्य खाण्यास अयोग्य असतानाही रेशन कार्ड बंद होईल या भीतीपोटी अनेक नागरिक नाईलाजाने हे धान्य उचलत आहेत.
मात्र घरी नेल्यानंतर हेच धान्य गुराढोरांना खाऊ घालण्यात येत असून काही नागरिक गावातील फेरीवाल्यांना विकून मोकळे होत असल्याची परिस्थिती ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
एकेकाळी श्रीमंत नागरिकांनाही भुरळ पाडणारे रेशन धान्य आज निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याने शासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सध्या शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांमधून कार्डधारकांना ज्वारी व तांदूळ या धान्याचे वाटप सुरू आहे.
नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेली ही ज्वारी संपूर्ण जिल्ह्यात वितरित केली जात आहे.
मोताळा तालुक्यात सुमारे ५० ते ५५ हजार क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली होती.
यातील काही ज्वारी इतर जिल्ह्यात पाठवण्यात आली असली तरी अद्याप मोठ्या प्रमाणावर ज्वारी मोताळा तालुक्यात शिल्लक आहे.
शासनाच्या आदेशानुसार ज्वारी खरेदीनंतर पुढील सहा महिन्यांपर्यंतच ती खाद्य म्हणून वितरित करणे आवश्यक आहे.
मात्र सात ते आठ महिने जुनी, मुदत संपलेली व भुसा झालेली ज्वारी नागरिकांच्या माथी मारली जात असल्याचा आरोप होत आहे.
यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून कुपोषणाचा धोका वाढत असल्याचे बोलले जात आहे.
हे पण वाचा..
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारमधील तीन जण गंभीर जखमी.
या संदर्भात मोताळा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेमार्फत २८ नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन जानेवारी महिन्यापासून ज्वारी बंद करून गहू वाटप सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र अद्यापही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने जिल्हाभरात निकृष्ट धान्याचेच वाटप सुरू असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे.
खाण्यायोग्य व दर्जेदार धान्य देण्यात यावे, अशी ठाम मागणी आता कार्डधारकांकडून होत आहे.
फोटो, व्हिडिओ किंवा माहिती Kattanews.in कडे पाठवा – तुमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवू.












