सिंदखेडराजा/प्रतिनिधी
गुंज गावात शेतकरी पुत्राची आत्महत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साखरखेर्डा तालुक्यातील गुंज गावातील विठ्ठल तुपकर (वय ३०) या शेतकरी पुत्राने फसवणुकीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.
या फसवणूक प्रकरणामुळे गुंज गाव हादरले असून परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक तपासात समोर आले की, विठ्ठल तुपकर यांना वाहन फायनान्स फसवणुकीचा त्रास होत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल तुपकर यांनी गेल्या वर्षी क्रुझर वाहन खरेदीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र पैसे भरल्यानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील मूळ मालकाने फायनान्स कंपनीचे कर्ज फेडले नाही. त्यामुळे कंपनीकडून वारंवार वसुलीचे फोन येत होते. या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
ठाणेदार गजानन करेवाड यांनी मूळ वाहन मालकाला संपर्क साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काही दिवस उलटून गेले तरी तोडगा निघाला नाही. वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने विठ्ठल मानसिक तणावाखाली आले. अखेर त्यांनी आपल्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
हे पण वाचा.
सकाळी त्यांच्या वडिलांनी शेतात गेल्यावर ही घटना उघडकीस आली. तत्काळ साखरखेर्डा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेने गुंज गाव आणि साखरखेर्डा परिसरात शोककळा पसरली आहे.
विठ्ठल हे संभाजीनगर-साखरखेर्डा मार्गावर प्रवासी वाहन चालवत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. गावकऱ्यांनी अश्रूंनी अंत्यसंस्कार केले.
गावकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली की, या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी. साखरखेर्डा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.










