बुलढाणा (चिखली)|प्रा.दिलीप नाईकवाड
चिखली शहरात गो सन्मान अभियानाच्या माध्यमातून एक मोठं आणि भावनिक आंदोलन पाहायला मिळालं. हजारो गोभक्तांनी स्वाक्षऱ्या करून राष्ट्रपतींपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, गोहत्या पूर्णपणे बंद व्हावी आणि गोसंवर्धनाला चालना मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे निवेदन तहसीलदारांच्या माध्यमातून सादर करण्यात आलं. या उपक्रमामुळे चिखलीत मोठं जनसमर्थन दिसून आलं असून, परिसरात घोषणांनी वातावरण भारावून गेलं.
यासोबतच राज्यभरात गोशाळा, नंदीशाळा आणि गोचिकित्सा केंद्र उभारण्यावर भर देण्यात यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी गोसंवर्धन हा महत्त्वाचा घटक ठरू शकतो, असा मुद्दा देखील यावेळी मांडण्यात आला.
या आंदोलनात सहभागी झालेल्या गोभक्तांनी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली. विशेष म्हणजे स्वाक्षरीयुक्त निवेदन डोक्यावर घेऊन मिरवणुकीत सहभागी होण्याचा अनोखा प्रकार पाहायला मिळाला. या मिरवणुकीमुळे शहरात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं.
या कार्यक्रमाला धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच परिसरातील सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. “गोमाता राष्ट्रमाता झालीच पाहिजे” आणि “गोहत्या बंद झालीच पाहिजे” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
दरम्यान, शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. या अभियानामुळे भविष्यात राज्यभरात आणखी मोठं जनआंदोलन उभं राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
👉 Related News
👉 हे आवश्यक करा..
अशाच ब्रेकिंग आणि स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या आणि WhatsApp वर शेअर करा.














