Advertisement
बुलढाणा |७ एप्रिल २०२६
जिल्ह्यातील धाड येथे अन्नातून विषबाधेची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेत एका कुटुंबातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणामुळे गावात शोककळा पसरली आहे. आई व एक मुलगी गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धाड येथील जमादार कुटुंबातील मोहम्मद वसीम जमादार (वय ४), मशीरा मोहम्मद जमादार (वय ७) आणि फातिमा मोहम्मद वसीम (वय ८) या तिघांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे.कुटुंबातील सदस्यांना ४ एप्रिलपासून मळमळ आणि अस्वस्थता जाणवत होती. सुरुवातीला घरगुती उपचार करण्यात आले, मात्र प्रकृती बिघडत गेल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ६ एप्रिल रोजी सकाळी दोन मुलांचा, तर रात्री एका मुलीचा मृत्यू झाला.आई अफरीन मोहम्मद वसीम (वय ३४) आणि आणखी एक मुलगी यांची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.दरम्यान, अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पुढील तपास धाड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे करत आहेत.
या घटनेमुळे धाड गावात शोकाचे वातावरण असून नागरिकांकडून या कुटुंबाबद्दल सहवेदना व्यक्त करण्यात येत आहे.
👉 ताज्या, विश्वासार्ह आणि जलद बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.