मोताळा /प्रवीण गरुडे प्रतिनिधी :
मोताळा तालुक्यातील दाभा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राजेंद्र रघुनाथ वास्कर यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) बुलढाणा पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि. ७) बुलढाणा तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आली.
तक्रारदाराच्या मृत बहिणी व भावाच्या नावावरील जमीन दोन मुलांच्या नावे नोंद करून उतारा देण्यासाठी ग्रामसेवकाने २८ हजार रुपये लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. प्राथमिक पडताळणीत मागणी खरी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला.
सापळ्यात ग्रामसेवकाने तडजोडीत २० हजार रुपये स्वीकारल्यावर त्याला पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पुढील गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि पोलिस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रमेश पवार यांच्या पथकाने केली.
पथकात सहभागी : विलास गुसिंगे, शाम भांगे, प्रवीण बैरागी, राजेंद्र क्षीरसागर, अमोल झिने, जगदीश पवार, रंजित व्यवहारे, शैलेश सोनवणे, लक्ष्मीकांत इंगळे, नितीन शेटे, अर्शद शेख आणि स्वाती वाणी.










