buldhana : पोलीस दलाने सुरू केलेला सोशल मीडिया सेल सक्रिय झाला आहे. चिखली येथील पोलीस ठाण्यात ठाणेदार संग्राम पाटील sangram patil यांनी हा सेल कार्यान्वित केला असून, आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. पडताळणी केली जात असतानाच एका महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची बाब निदर्शनास आली. याप्रकरणी रोहिदासनगर rohidasnagr येथील यश संतोष टिपारे santosh tipare यास अटक करण्यात आली.
व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवर टाकण्यात येणाऱ्या पोस्टची पडताळणी करून ‘आक्षेपार्ह’ पोस्ट असल्यास त्याबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी चिखली पोलीस ठाण्यात सोशय मीडिया सेल कार्यान्वित करण्यात आला आहे. या सेलकडून आज रोजी पडताळणी करत असताना २ ऑक्टोबर रोजी यश संतोष टिपारे याने त्याच्या फेसबुक अकाउंटवर महापुरुषाचा आक्षेपार्ह फोटो व त्याखाली आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचे निदर्शनास आले. या पोस्टमुळे समाजातील वेगवेगळ्या गटातील जन समुदायामध्ये द्वेषाची भावना निर्माण होऊन, सार्वजनिक आगळीक होईल व त्यातून सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होण्याची शक्यता पाहता पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणाची तत्काळ दखल घेतली.
पोलीस अंमलदार राजेश गोंड यांच्या फिर्यादीवरून आरोपी यश टिपारे याच्याविरुद्ध कलम १९६ (१) (अ) (ब), ३५३ (२) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपीला अटक करण्यात आली. आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची बुलढाणा जिल्हा कारागृहात रवानगी केली. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार विष्णू नेवरे, प्रकाश शिंदे, विजय गिते, विजय किटे, राजेश गोंड, सुनील राजपूत यांनी ही कारवाई केली.
आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कठोर कारवाई करणार : ठाणेदार पाटील
पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस स्टेशनमधील सोशल मीडिया लॅबद्वारे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अकाउंटवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सध्या सण, उत्सवाचा कालावधी सुरू आहे. नजीकच्या काळातच निवडणुका होणार आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह धार्मिक, राजकीय, आक्षेपार्ह वैयक्तिक टिका टिप्पणी करू नये, अशी आक्षेपार्ह पोस्ट निदर्शनास आल्यास सोशल मीडियाधारकाविरुद्ध प्रचलित कायद्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणेदार संग्राम पाटील यांनी दिला आहे.