साखरखेर्डा/प्रतिनिधी
बुलढाणा (buldhana) जिल्ह्यात प्रत्येक घटना ..सिंदखेडराजात तालुक्यातील साखरखेर्डा येथून जवळच असलेल्या पिंपळगाव सोनारा येथे सुमारे २५ ते ३० व्यक्तींना भगर खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन मळमळ व उलट्या झाल्याची घटना ४ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. बाधित व्यक्तींनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असून जवळपास सर्वांचीच प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भगरीचा दर्जा, त्याची विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या अन्न व औषध प्रशासनाची हयगय यावर्षी सुध्दा दिसून आली आहे.
नवरात्रोत्सव सुरु झाल्याने अनेक जण नऊ दिवसांचा उपवास करतात. त्याप्रमाणे पिंपळगाव सोनारा (pimpalgaon sonara) येथील व्यक्तींनी सुध्दा उपवास केलेला आहे. त्यामध्ये महिलांचेच प्रमाण अधिक आहे. उपवासा दरम्यान भगर साबुदाणा, शेंगदाणे, फळफळावळ आदि खाद्य पदार्थांचे सेवन केल्या जात असते. मात्र सोयीची असलेली भगर हा खाद्यपदार्थ या काळात मोठ्या प्रमाणावर खाण्यासाठी उपयोगात आणल्या जातो. ३ सप्टेंबर पासून उपवासाला प्रारंभ झाला असून, बहुतांश घरोघरी भगरीचे खाद्यपदार्थ खाणे सुरु झाले आहेत. यातूनच पिंपळगाव सोनारा येथे आज सकाळी २५ च्या वर व्यक्तींना भगर खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन मळमळ व उलट्या झाल्याची घटना घडली.
त्यामुळे सगळ्यांनीच साखरखेर्डा गाठून आपापल्या परीने उपचारासाठी विविध दवाखान्यात जाऊन भरती झाले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३४ ते ६५ वयोगटातील नारायण उत्तमराव ठोसरे, वय ४५, चंद्रकांत पळसकर, वय ६० वर्षे, शशिकला नारायण ठोसरे, वय ६५ वर्षे, सविता देविदास बिनोरकर, वय ४५ वर्षे, गीता लक्ष्मण भागीले, वय ३४ वर्षे, चंद्रकला तेजराव पळसकर, वय ५० वर्षे या ६ व्यक्ती दाखल झाल्या होत्या. डॉ. संदीप सुरुसे यांच्यासह चमूने त्यांच्यावर उपचार केले. तासा दोन तासात या सर्व महिलांना बरे वाटल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.आजही अनेक किराणा दुकानातून मुदत संपल्यानंतर भगरीची विक्री सुरू आहे. तर मुदत संपल्यानंतर भगरीचे पिठतयार करून विकले जात आहे. बऱ्याच किराणा दुकानातून या अगोदर मुदत संपलेल्या भगरीची विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.