
buldhana news : जंगलाला लागून असलेल्या शेतात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला. गिरडा शिवारात २९ ऑगस्टला दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी, शेतमजुरांसह ग्रामस्थांमध्ये ‘बिबट्याची’ दहशत पसरली आहे. सुनील सुभाष जाधव sunil shubhash jadhav (३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
तालुक्यातील गिरडा girda येथील रहिवासी असलेले सुनील जाधव sunil jadhavयांचे शेत गावापासून तीन किलोमीटर अंतरावर जंगल शिवारात आहे. शेतात काम करण्यासोबतच माकडांपासून पिकांचे संरक्षणदेखील ते करत होते. मात्र, गुरुवारी दुपारी अडीच ते तीन वाजेदरम्यान पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर सुनील जाधव यांचा मृतदेह बिबट्याने ओढत जंगलात नेला.
ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती समजल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. रेस्क्यू टीमही दाखल झाली. परिविक्षाधीन सहायक उपवनसंरक्षक अपेट यादेखील पोहोचल्या. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसर पिंजून काढला. मात्र, त्याच्या पाऊलखुणाशिवाय दुसरे काहीच सापडले नाही. या घटनेमुळे गावकरी भयभीत झाले आहेत. सर्वांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
वनविभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
गिरडा शिवारात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. यामुळे हिंस्त्र श्वापदे शेतशिवारात आणि गावापर्यंत येत आहेत. तक्रारी करूनही वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे यांच्याकडून ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असल्याचे सांगूनदेखील वनविभाग दखल घेत नसल्याची ओरड गिरडासह परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.