देऊळगाव राजा/प्रतिनिधी (जि. बुलढाणा):
अंढेरा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धडाकेबाज कारवाईत दोन चोरट्यांना जाफ्राबाद (जि. जालना) येथे पकडून ट्रॉली आणि रोटाव्हेटर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईनंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील सरंबा येथील शेतकरी पवन शिवदास चेके यांच्या ट्रॅक्टरवरील ट्रॉली आणि शेतकरी विकास संपत चेके यांच्या ट्रॅक्टरवरील रोटाव्हेटर हे २१ सप्टेंबर रोजी चोरीला गेले होते. या दोन्ही शेतकऱ्यांनी अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या.
दरम्यान, अंढेरा ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. १ नोव्हेंबर रोजी एलसीबी पथकाने जाफ्राबाद (जि. जालना) परिसरात छापा टाकून दोन आरोपींना पकडण्यात यश मिळवले.
हे पण वाचा.
‘समृद्धी’वरील सोन्याची लूट! पोलिसांकडून आरोपींची पुन्हा कोठडी – अजूनही हरवले अडीच कोटींचं सोने.
पोलिसांनी अमोल सुरेश शेवत्रे (वय ३३, रा. ब्रह्मपुरी, ता. जाफ्राबाद, जि. जालना) आणि गणेश आत्माराम वायाळ (वय ३७, रा. सावरखेडा वाणी, ता. जाफ्राबाद, जि. जालना) या दोघांना अटक करून चोरीस गेलेली ट्रॉली आणि रोटाव्हेटर जप्त केली.
दोन्ही आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणातील आणखी एका मुख्य आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.
अंढेरा पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांचा पोलिस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
अशाच प्रकारच्या विविध बातम्यांसाठी आत्ताच आपल्या kattanews.in या न्यूज पोर्टल वेबसाईटला भेट द्या.










