साखरखेर्डा/प्रतिनिधी
Sakharkherda Crime Update : साखरखेर्डा परिसरात एका रात्रीत झालेल्या सलग घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या या घटनेचा तपास जोरात सुरू असून पोलीस विविध ठिकाणी तपास करत आहेत. या चोरीने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून टीमने दिलेल्या माहितीनुसार ही चोरी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली.
फॉरेन्सिक व श्वानपथक पाचारण करण्यात आले असून sakharkherda police या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहत आहे.
साखरखेर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत शिंदी येथे सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका घरातून सोन्याचे दागिने चोरी केले. शरद पंढरीनाथ खरात यांच्या घराच्या मागच्या बाजूने
कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेल्या दागिन्यांमध्ये एक तोळा पोत, एक तोळा गहू मन्याची पोत, १२ तोळे सोने असा ४ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
आजच्या बाजार भावानुसार चोरी गेलेल्या दागिन्यांची किंमत ४ लाखांच्या आसपास आहे. शरद खरात यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच सरपंच अशोक खरात यांनी ठाणेदार गजानन करेवाड यांना कळवले व त्यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
श्वानपथक, फॉरेन्सिक टीम व फिंगरप्रिंट एक्स्पर्ट यांनी घटनास्थळी तपास करून
महत्वाचे फिंगरप्रिंट जमा केले. त्याचदरम्यान जिवन खरात यांच्या शेतातील बखारीत दारूची बाटली आढळली जी पोलिसांनी जप्त केली. याशिवाय भगवान वामन बंगाळे यांच्या घराचा कडी कोंडा तोडण्याचा प्रयत्न झाला तर मंगेश बंगाळे यांच्या घराचा कडी कोंडा तोडलेला आढळला.
या सर्व चोरीच्या प्रयत्नांमुळे गावात तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाचा तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन राजे जाधव करीत आहेत.













