मानोरा प्रतिनिधी/सुधीर ढगे
मानोरा : मानोरा शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून श्री संत गजानन महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. आज दिनांक ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मानोरा येथे परमपूज्य श्री शशिकांत देव यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या बैठकीत २ डिसेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्राणवजी जोशी, अंबादासजी पिंपळकर, उमेशजी देशमुख, श्रीनिवास पाठक हे प्रमुख मान्यवर गजानन महाराज यांच्या सेवेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री रामकृष्णजी गावंडे यांनी दिली.
बैठकीस मंदिर समितीचे श्री बण्णोरे साहेब, श्री रामा आप्पाजी बेंद्रे, भाऊसिंग राठोड, सुनील मात्रे, विजय भाऊ चव्हाण, धीरज म्हात्रे, गणेश पिंपळकर तसेच मानोऱ्यातील अनेक भाविक उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा भव्य आणि भक्तिमय करण्याचा संकल्प करण्यात आला.
२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्राणप्रतिष्ठा मूर्तीची शोभायात्रा मानोरा नगरातील आरोग्य दैवत गणेश मंदिर पासून निघणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक भव्य स्वरूपात पार पडणार असून, ढोल-ताशे, कीर्तन आणि भजनाने मानोरा शहर गजाननमय होणार आहे.
दत्त जयंती निमित्ताने आयोजित हा सोहळा ४ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह पार पडणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.










