विशाल गवई/चिखली (जि. बुलढाणा) –
शहर हादरवून टाकणारी धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या सोमठाणा येथील स्वप्निल किशोर पवार (वय 29) या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल हा दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात अचानक नाल्यात पडून वाहून गेला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम सुरू केली होती. मात्र, त्याचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता.
अखेर आज (सोमवार, २७ ऑक्टोबर) सकाळी सुमारे ९.३० वाजता कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे फार्मसी कॉलेज समोर असलेल्या नाल्यात त्याचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला असून तो पोस्टमार्टमसाठी जिल्हा उपरुग्णालय, चिखली येथे हलविण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शहरात शोककळा पसरली आहे.दरम्यान, स्वप्निल हरवल्याची तक्रार नातेवाईकांनी २६ ऑक्टोबर रोजी चिखली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास आणि शोधमोहीम सुरू केली होती. पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कदम आणि रोहिदास पंढरे करीत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, शहरातील नाल्यांची साफसफाई वेळेवर न झाल्याने आणि जोरदार पावसामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना टाळता येत नाहीत. प्रशासनाने यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.या घटनेमुळे स्वप्निलच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.










