lakhandur zp news : स्वच्छतागृहात करंट लागून पहिलीतील चिमुकलीचा मृत्यू !

lakhandur zp news

lakhandur zp news : इयत्ता पहिल्या वर्गात मोठ्या उत्साहाने तिने पाऊल ठेवले; पण सत्राच्या तिसऱ्या दिवशीच शाळेच्या गलथानपणामुळे तिचा जीव गेला. स्वच्छतागृहात पडून असलेल्या अॅल्युमिनियम क्वॉईल्ड वायरच्या स्पर्शामुळे विजेचा धक्का बसून तिचा मृत्यू झाला. यशस्वी सोपान राऊत yashasvi sopan raut (६ वर्षे), असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ही घटना बुधवारी (दि. ३) सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पुयार जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली.

 

 

 

अन्य विद्यार्थिनी स्वच्छतागृहात गेल्या असता त्यांना यशस्वी पडलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी घटनेची माहिती शिक्षकांना दिली. तिला तातडीने लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, गावकऱ्यांची गर्दी आणि आक्रोश पाहता गावात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनीही शाळेत धाव घेतली. संबंधित जिल्हा परिषद शाळा पुरस्कार प्राप्त होती. गेल्या सत्रामध्ये ‘मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेमध्ये शाळेने तालुक्यातून पहिला पुरस्कारही मिळविला होता.

 

 

 

निव्वळ गलथानपणाच !

जिवंत वीजप्रवाह असलेला वायर स्वच्छतागृहात पडून असल्यानेच ही दुर्घटना घडली, त्यामुळे शाळेचा गलथानपणाच समोर आला आहे. ‘अॅल्युमिनियम क्चॉईल्ड वायर’ बेवारसपणे स्वच्छतागृहातच कशी?, त्यात विजेचा प्रवाह कसा आला? वायर कधीपासून होती? याकडे कुणाचे लक्ष का गेले नाही? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे समोर येतात. सॅनिटरी पॅड मशीनसाठी लावलेला विजेचा बोर्डही उघड्यावर असल्याने पावसात धोका होऊ शकतो, हे कुणाच्या लक्षात का आले नाही?

 

 

 

गावकऱ्यांचा ठिय्या

यशस्वीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यावर गावकऱ्यांनी रुग्णालयासमोरच ठिय्या आंदोलन केले. जबाबदार असलेल्यांना निलंबित करा आणि आर्थिक नुकसानभरपाई करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मुख्याध्यापक निलंबित

दुर्घटनेला जबाबदार ठरवून प्रभारी मुख्याध्यापक नीलकंठ भावे यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.