मेहकर | माधव भांदुर्गे
दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबाला दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट त्यांच्या घरी भेट दिली. मेहकर येथील शेतकरी दामोदर इंगळे यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी इंगळे कुटुंबासोबत ठेचा-भाकरीचे साधे घरगुती भोजनही केले. शेतकरी कुटुंबाच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर त्यांनी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देत कुटुंबाला आधार दिला.
दुष्काळी परिस्थितीचा शेती आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर मोठा परिणाम होत असतो. अशाच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या दामोदर इंगळे यांच्या कुटुंबाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबातील सदस्यांशी आस्थेने संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
शेती करताना येणाऱ्या अडचणी, दुष्काळामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती, कुटुंबाच्या गरजा आणि उदरनिर्वाहासाठी करावी लागणारी धडपड याबाबत त्यांनी माहिती घेतली. शेतकरी कुटुंबाच्या घरी पोहोचल्यानंतर इंगळे कुटुंबीयांनी त्यांचे घरगुती पद्धतीने स्वागत केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी कुटुंबासोबत भाकर, लोणचे आणि ठेचा असे साधे भोजन घेतले. या भेटीतील ठेचा-भाकरीच्या भोजनाचीही परिसरात चर्चा होत आहे.
या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दामोदर इंगळे यांच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. संकटाच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे इंगळे कुटुंबाला मोठा आधार मिळाला. उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः घरी येऊन विचारपूस केल्याने कुटुंबीयांना दिलासा मिळाला.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना आवश्यक मदत आणि दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, कोणत्याही शेतकऱ्याला संकटाच्या काळात एकटे पडू दिले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या भेटीप्रसंगी केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट, आमदार संजय गायकवाड, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
दुष्काळ आणि शेतीतील अनिश्चिततेमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांना मदतीचा आधार देणे महत्त्वाचे ठरते. मेहकर येथील दामोदर इंगळे यांच्या घरी झालेली उपमुख्यमंत्र्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
- बुलढाण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! प्रतापराव जाधव-सुबोध सावजींची गळाभेट; ‘दोन मल्ल एकत्र आले’ या विधानाची चर्चा
- केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात बालाजी मंदिरात महाआरती; शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
- मेहकर-चिखली मार्गावर साखरखेर्डा पोलिसांची मोठी कारवाई! वाळू वाहतूक करणारी ३ वाहने जप्त; ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
बातमी : Katta News










