चिखली |विशाल गवई
रुग्णालयातील बिलाच्या उर्वरित एक हजार रुपयांवरून डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाइकांमध्ये झालेला वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. पतीला मारहाण केल्यासह आपला नकाब ओढून विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी डॉ. सुहास खेडेकर यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रतिआरोप डॉक्टरांनी केला असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या मोठ्या भावाला २५ नोव्हेंबर रोजी सर्पदंश झाल्याने चिखली येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर दुसऱ्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज मिळणार असल्याने महिला आणि तिचे पती रुग्णालयात गेले होते. यावेळी औषधांचे २४ हजार १२७ रुपये ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आले.
यानंतर रुग्णालयाचे स्वतंत्र बिल ११ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्यापैकी १० हजार रुपये भरल्यानंतर उर्वरित एक हजार रुपये काही वेळात देतो, असे महिलेच्या पतीने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, याच रकमेवरून डॉक्टरांच्या केबिनमध्ये वाद सुरू झाला.
केबिनमधून भांडणाचा आवाज ऐकून महिला आत गेली असता, डॉक्टर आपल्या पतीला शिवीगाळ करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत असल्याचे तिने पाहिल्याचा आरोप केला आहे. पतीला मारहाण करू नका, असे सांगत ती मध्ये पडली असता तिच्याशी धक्काबुक्की करण्यात आली आणि चेहऱ्यावरील बुरख्याचा नकाब ओढण्यात आल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या झटापटीत मानेवर ओरखड्याची जखम झाल्याचेही तिने नमूद केले आहे.
दरम्यान, वाद सोडवण्यासाठी आलेल्या रुग्णाच्या भावालाही धक्काबुक्की करण्यात आली आणि सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉ. सुहास खेडेकर यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे, या प्रकरणावर डॉ. सुहास खेडेकर यांनी प्रसारमाध्यमांकडे आपली बाजू मांडली. आपण सध्या बाहेरगावी असल्याचे सांगत त्यांनी दूरध्वनीवरून प्रतिक्रिया दिली. रुग्णालयाच्या बिलामध्ये यापूर्वीच कपात करण्यात आली होती. तरीही रुग्णाच्या नातेवाइकांनी वाद घातला, अंगावर बिल फेकले आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली, असा दावा त्यांनी केला.
रुग्णालयात तसेच आपल्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असून, घडलेला संपूर्ण प्रकार त्यामध्ये कैद झाला आहे. हे फुटेज पोलिसांना देणार असल्याचेही डॉ. खेडेकर यांनी सांगितले. हा प्रकार म्हणजे ‘अॅक्शनला रिअॅक्शन’ असल्याचे म्हणत त्यांनी आपल्यावरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर स्वतःची बाजू मांडली.
एकीकडे महिलेने मारहाण आणि विनयभंगाचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाइकांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज, संबंधितांचे जबाब आणि पोलिसांचा तपास यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. चिखलीतील या रुग्णालयीन वादात नेमके काय घडले, हे पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.
📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवा!
अशाच ताज्या बातम्या आणि स्थानिक घडामोडींसाठी Katta News सोबत जोडलेले राहा.
बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडींसाठी आत्ताच भेट द्या 👉 https://kattanews.in/
Katta News – बातमी आपल्या गावाची, आवाज आपल्या माणसांचा!
हेही वाचा
- भगवी पगडी, अंगाला भस्म अन् आशीर्वादाचा बहाणा! संभाजीनगरचा रस्ता विचारला, शुद्धीवर येताच खिशातील १०,१०० रुपये गायब!
- साखरखेर्डा परिसरात केबल चोरट्यांचा धुमाकूळ! शिंदीतील दोन शेतकऱ्यांच्या शेतातून केबल लंपास
- मेहकर तहसीलच्या पुरवठा विभागात दलालांचा सुळसुळाट! रेशन कार्डच्या नावाखाली नागरिकांची लूट; CCTV तपासण्याची मागणी










