बुलढाणा | भागवत गायकवाड
सण-उत्सव, लग्नसमारंभ किंवा अन्य कारणांमुळे नागरिक बाहेरगावी जात असताना बंद घरांमध्ये चोरी व घरफोडीच्या घटना घडण्याची शक्यता असते. अशा घटना टाळण्यासाठी धाड पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घर बंद करून बाहेरगावी जाण्यापूर्वी शेजाऱ्यांना माहिती देणे, मजबूत कुलूप लावणे, मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे आणि परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
नागरिकांनी घराबाहेर जाताना विश्वासू शेजाऱ्यांना घराची माहिती द्यावी आणि शक्य असल्यास घरावर लक्ष ठेवण्यास सांगावे. लग्नसमारंभ किंवा अन्य कारणांसाठी घर दीर्घकाळ बंद ठेवून बाहेरगावी जात असल्यास शेजारी अथवा पोलिसांना याबाबत माहिती द्यावी. घराच्या दरवाजाला उच्च दर्जाचे कुलूप तसेच मजबूत कडी-कोयंडा लावण्याचीही सूचना करण्यात आली आहे.
घराच्या बाहेरून दिसणारे दिवे सुरू ठेवावेत, परिसरात चांगल्या दर्जाचे नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि घराच्या आजूबाजूला व गल्लीतील पथदिवे सुरू राहतील याची दक्षता घ्यावी. परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या किंवा वस्तू विक्रीच्या बहाण्याने येणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवावे. शक्य असल्यास सुरक्षितपणे त्यांचे छायाचित्र काढून ठेवावे, असे पोलिसांनी सुचविले आहे.
घरातील सोने, चांदी, दागिने आणि रोख रक्कम कपाटात ठेवण्याऐवजी शक्यतो बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावी. गावाच्या किंवा शहराच्या बाहेरील भागात असलेल्या घरांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता लक्षात घेता अशा घरमालकांनी विशेष दक्षता घ्यावी.
गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करून नागरिकांनी आळीपाळीने रात्रीची गस्त घालावी. तसेच शक्यतो घरातील सर्व सदस्य एकाच वेळी बाहेरगावी जाणे टाळावे आणि घरात एखादी व्यक्ती उपस्थित राहील, याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी डायल 112 वर संपर्क साधावा. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
सण-उत्सव आनंदात आणि सुरक्षित वातावरणात साजरे व्हावेत, नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे आणि चोरी व घरफोडीच्या घटना रोखता याव्यात, यासाठी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“आपली सतर्कता, आपल्या घराची सुरक्षा!” या संदेशासह धाड पोलीस स्टेशन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 24 तास सतर्क असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहा. पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे यांनी केले आहे.
📲 Join WhatsApp Group ✅ – बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या मिळवा
अशाच ताज्या स्थानिक बातम्यांसाठी KattaNews.in ला भेट देत राहा.
संबंधित बातम्या :
- इंस्टाग्रामवर प्रेम जुळले, १२ वर्षांचा संसार मोडला! चार वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन महिला ३० वर्षीय युवकासोबत निघून गेली
- देऊळगाव राजात तहसील कार्यालयातून सराफाला नेले; अपहरणाची चर्चा, नाकाबंदीत तेलंगणा पोलिसांचा मोठा खुलासा!
- देऊळगाव राजा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर महसूल-पोलिसांची धडक कारवाई; एकाच वेळी ९ टिप्पर जप्त










