देऊळगाव राजा | मनोहर खंदारे
श्री बालाजी महाराजांच्या जयघोषाने आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत देऊळगाव राजा येथील ऐतिहासिक लळितोत्सव गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५:४५ वाजता उत्साहात संपन्न झाला. तब्बल ३३४ वर्षांची परंपरा लाभलेल्या या सोहळ्यात मंदिरासमोरील २१ महाकाय लाटा एकाच वेळी कलंडण्याचा क्षण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
विदर्भासह महाराष्ट्रातील विविध भागांतून भाविक या उत्सवासाठी देऊळगाव राजात दाखल झाले होते. श्री बालाजी महाराजांच्या या अनोख्या परंपरेचा अनुभव घेण्यासाठी अनेक भाविकांनी आदल्या दिवसापासूनच शहरात उपस्थिती लावली होती.
विजयादशमीच्या पूर्वसंध्येला श्री बालाजी महाराजांच्या मंदिरासमोर २१ महाकाय लाकडी लाटा आणि ४२ मंडप दोरांच्या साहाय्याने उभारण्यात आले होते. या मंडपोत्सवाला सलग दहा दिवसांची परंपरा लाभली आहे. लाटा आणि मंडपांखालून जाण्यासाठीही भाविकांची मोठी गर्दी होत होती.
लळितोत्सवाच्या दिवशी सकाळी काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. मंदिरावर दहीहंडी बांधण्यात आली. ब्रह्मवृंदांच्या वतीने शांतिपाठ करण्यात आला, तर त्यानंतर काल्याचे कीर्तन झाले. श्री बालाजी महाराजांची आरती सुरू असताना आणि दहीहंडी फुटल्यानंतर एकाच वेळी सर्व २१ लाटा मंदिराच्या दिशेने कलंडल्या. हा क्षण पाहताना उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात आणि श्री बालाजी महाराजांच्या जयघोषात आनंद व्यक्त केला.
उत्सवातील प्रमुख विधी पूर्ण झाल्यानंतर श्री बालाजी महाराजांच्या मूर्तीची विधिवत गाभाऱ्यात प्रतिष्ठापना करण्यात आली. धार्मिक विधी, पारंपरिक रचना आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता.
लळितोत्सवानंतर श्री बालाजी संस्थानच्या वतीने भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रसाद तयार करणे आणि त्याचे वितरण करण्याची जबाबदारी मारवाडी समाजाने परिश्रमपूर्वक पार पाडली. अतिरिक्त प्रसादाची मागणी करणाऱ्या भाविकांसाठी प्रति लाडू १० रुपये दराने प्रसाद उपलब्ध करून देण्यात आला. या उपक्रमाला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
उत्सवासाठी शहरात दाखल झालेल्या भाविकांच्या सेवेसाठी विविध सामाजिक संघटना आणि मित्रमंडळांनी चहा, नाश्ता तसेच इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था केली होती. श्री बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी विविध सेवा स्टॉलना भेट दिली. संस्थानच्या वतीने सेवाकार्य करणाऱ्या मंडळांचा सत्कारही करण्यात आला.
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या महिला स्वयंसेविकांच्या सेवाकार्यानेही यंदाच्या उत्सवात लक्ष वेधून घेतले. परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत अन्नछत्र सेवा, मंदिर परिसराची स्वच्छता, दर्शन रांगांचे नियोजन आणि लाडू प्रसाद वितरण अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. संपूर्ण आठवडाभर चाललेल्या या सेवाकार्याचे नियोजन राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
लळितोत्सव शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडावा यासाठी संस्थानचे विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापक किशोर बीडकर, संस्थानचे कर्मचारी, पोलीस प्रशासन, मानकरी, सेवेकरी आणि स्थानिक नागरिकांनी परिश्रम घेतले.
३३४ वर्षांची परंपरा जपत पार पडलेला देऊळगाव राजातील हा लळितोत्सव भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा अनोखा अनुभव ठरला. श्री बालाजी महाराजांच्या दर्शनासह या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याची आठवण घेऊन भाविकांनी उत्सवाचा निरोप घेतला.
🙏 देऊळगाव राजा आणि बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या सर्वप्रथम मिळवा!
स्थानिक घडामोडी, धार्मिक उत्सव, शेती, शिक्षण आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी KattaNews.in सोबत जोडलेले राहा.
📌 संबंधित बातम्या वाचा
- श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची थेट दिल्लीपर्यंत मजल; अर्जुन वाघमारेंची राज्यस्तरीय ११ सदस्यीय चमूत निवड
- देऊळगाव राजा बाजार समितीच्या जमिनींची चौकशी सुरू! चंद्रकांत खरात यांच्या तक्रारींची प्रशासनाकडून दखल
- ३३४ वर्षांची परंपरा! देऊळगाव राजात बालाजींच्या पालखी सोहळ्याला भक्तांची मांदियाळी; ५२ थांब्यांवर दर्शन
ही बातमी आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. देऊळगाव राजातील लळितोत्सवाचा अनुभव आणि अशाच स्थानिक बातम्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी KattaNews.in ला सहकार्य करा.










