बुलढाणा | प्रा.दिलीप नाईकवाड
महिला सक्षमीकरण, दारूबंदी चळवळ आणि सामाजिक जनजागृतीच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने कार्य करणाऱ्या ॲड. सौ. वृषालीताई राहुल बोंद्रे यांच्या सामाजिक कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२३-२४ चा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ जिल्हास्तरीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यासाठी मिळालेला हा पुरस्कार वृषालीताई बोंद्रे यांच्या २५ वर्षांच्या कार्याचा गौरव मानला जात आहे. ३ सप्टेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांच्या हस्ते त्यांनी हा सन्मान स्वीकारला.
हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, अनुराधा व हिरकणी परिवार तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच महिला सक्षमीकरण, सामाजिक जागृती, दारूबंदी आणि व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात सातत्याने काम केले आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. मात्र, त्याच काळात बोंद्रे परिवारात काही दुखद घटना घडल्याने वृषालीताई बोंद्रे यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे पुरस्कार स्वीकारण्याचा सोहळा ३ सप्टेंबर रोजी पार पडला.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांच्या हस्ते ॲड. वृषालीताई बोंद्रे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला शारदाताई वानेरे, ज्योतिताई फिसके, प्रकाश लकडे, गोपाल म्हस्के यांच्यासह विविध क्षेत्रातील स्नेही व मान्यवर उपस्थित होते.
महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात वृषालीताई बोंद्रे यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहिला आहे. महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जाता यावे, यासाठी त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत.
गौरी सजावट स्पर्धा, महिला दिन, हळदी-कुंकू, मातृदिन, योग शिबिरे तसेच दारूबंदी आणि व्यसनमुक्ती जनजागृती यांसारख्या उपक्रमांमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणण्यासोबतच सामाजिक प्रश्नांबाबत जागृती निर्माण करण्याचे काम करण्यात आले.
पुरस्काराबद्दल बोलताना ॲड. वृषालीताई राहुल बोंद्रे म्हणाल्या, “महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. गेल्या २५ वर्षांपासून हिरकणी व अनुराधा परिवाराच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.”
महिलांना सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक आणि आरोग्य क्षेत्रात संधी मिळावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, हा कार्याचा केंद्रबिंदू राहिला असल्याचे त्यांनी सांगितले.
“गौरी सजावट स्पर्धा, महिला दिन, हळदी-कुंकू, मातृदिन, योग शिबिरे तसेच दारूबंदी व व्यसनमुक्ती जनजागृतीसारख्या उपक्रमांना महिलांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच आमच्या कार्याची खरी प्रेरणा आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी विचारांचा आदर्श समोर ठेवून महिलांसाठी काम करत आले आहे आणि यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात काम करत राहू,” असा निर्धार वृषालीताई बोंद्रे यांनी व्यक्त केला.
वृषालीताई बोंद्रे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल अनुराधा व हिरकणी परिवारासह सामाजिक, राजकीय, महिला आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. महिलांसाठी सातत्याने काम करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्तीच्या २५ वर्षांच्या प्रवासाला मिळालेली ही शासनाची पावती असल्याची भावना व्यक्त होत आहे.
📲 KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा.
हेही वाचा










