हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; रविकांत तुपकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

On: September 3, 2026 5:26 AM
Follow Us:
रविकांत तुपकरांची महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

बुलढाणा |प्रतिनिधी : पंडित म्हस्के 

पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने महाराष्ट्रातील अनेक भागांतील खरीप पिके संकटात सापडली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातही अनेक गावांमध्ये पावसाअभावी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि मका या पिकांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्य शिष्टमंडळाने 2 सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांच्या नावाने विविध मागण्यांचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, युवा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे, मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे आणि बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासह राज्यस्तरीय शिष्टमंडळ या भेटीत सहभागी झाले होते.

यावेळी तुपकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. खरीप हंगामात अनेक भागांमध्ये पावसाने मोठी उघडीप दिल्यामुळे पिकांना आवश्यक पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने उभी केलेली पिके संकटात आली आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी पिके करपण्यास सुरुवात झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. पावसाचा खंड आणखी वाढल्यास सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि मका यासह इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आणि इतर शेतीच्या कामांसाठी मोठा खर्च केला आहे. अनेक शेतकरी कर्ज घेऊन शेती करतात. अशा परिस्थितीत पिकांचे नुकसान झाले तर त्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढू शकतात. त्यामुळे शासनाने परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी तुपकर यांनी केली.

पावसाचा खंड आणखी वाढल्यास खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची भीती आहे, असे सांगत तुपकर यांनी तातडीने दुष्काळी उपाययोजना सुरू करण्याची मागणी केली.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने बुलढाणा जिल्ह्यासह पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झालेल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. महसूल आणि कृषी विभागामार्फत तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाला तसेच शेतीशी संबंधित इतर कर्जांना तातडीने स्थगिती द्यावी आणि कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत देऊन शेतीपंपांना नियमित वीजपुरवठा करावा. पिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सिंचनाचे तातडीने नियोजन करावे, उपलब्ध जलसाठ्यांचा वापर करावा आणि गरज असलेल्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, असे संघटनेने म्हटले आहे.

पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने मंजूर करून वितरित करावी. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मनरेगाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करावीत. पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना मोफत किंवा अनुदानित बियाणे, खते आणि आवश्यक कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.

पावसाअभावी शेतकऱ्यांवर वाढणारा आर्थिक आणि मानसिक ताण लक्षात घेऊन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदत आणि समुपदेशन यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

याशिवाय पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्ववेळेत वीज उपलब्ध करून द्यावी आणि जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलून द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी संघटनेचे नेते अमोल मोरे, अॅड. प्रवीण सुरडकर, सुनील मिसाळ, बाळू पाटील, नितीन सोनटक्के, निलेश राजपूत, रामेश्वर अंभोरे, श्रीराम चलवाड, विठ्ठल खेडेकर, हरिभाऊ उबरहांडे, भागवत धोरण, अरबाज खान, हनुमान मिसाळ, लक्ष्मण भगत, संजय काकडे, मंगेश मिसाळ, पवन काकडे आणि हर्षल गवते यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

📲 ताज्या बातम्यांसाठी WhatsApp ग्रुप

महाराष्ट्रातील स्थानिक बातम्या, शेतकरी योजना, बाजारभाव, हवामान आणि महत्त्वाच्या अपडेट्स थेट मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

👉 येथे क्लिक करा

📰 Related News

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment